जळगाव मिरर | २९ मार्च २०२४
राज्यातील अनेक शहरात प्रेम प्रकरणाच्या माध्यमातून गुन्हेगारी घटना घडत असतांना एक संतापजनक घटना सोलापूर शहरात घडली आहे. लग्नाचे आमिष दाखवून जातीचा विचार न करता विविध लॉजमध्ये नेऊन शरीर संबंध प्रस्थापित केले. परंतु दुसऱ्याच मुलीबरोबर संसार थाटण्याच्या प्रयत्न ात असलेल्या प्रियकरास ऐन हळदीच्या कार्यक्रमातच पीडित तरुणीने उपस्थित राहून भावी पतीस व नातेवाईकास जाब विचारला. याप्रकरणी ८ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाचे आमिष दाखवून विक्रम सुनीलदत्त मोरे यांनी पीडित तरुणीच्या ओळखीचा गैरफायदा घेत तिच्यावर वेगवेगळ्या लॉजमध्ये नेऊन अत्याचार केले. २९ फेब्रुवारी २४ रोजी विक्रम मोरे याच्या घरी लग्नकार्यातील हळदीचा कार्यक्रम सुरू असल्याचे दिसून येताच फिर्यादीने तडक त्या ठिकाणी जाऊन विक्रम मोरे याच्यासह उपस्थित नातेवाईकांना जाब विचारला. मला कमीत कमी सांगायला तर पाहिजे होते परंतु माझा विश्वासघात केला आहे. असे म्हणून उपस्थित लोकांकडे विचारणा केली.
त्यावेळी विक्रम मोरे त्याची आई संगीता मोरे, गोकुळ मवारे तेथील उपस्थित चार अनोळखी महिला, एक अनोळखी पुरुष यांनी जातीवाचक शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. तु येथे का आली? तुला खल्लास करून टाकू, तुला जिवे मारून टाकण्यास वेळ लागणार नाही. तू हलक्या जातीची आहे. तुझे व आमचे जमणार नाही. असे जातीवाचक शब्द वापरून दमदाटी केली. त्यामुळे पीडित तरुणीने ८ जणांच्या विरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून ८ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.