जळगाव मिरर । २१ डिसेंबर २०२२
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर ने राज्यातील उद्योजक, व्यापारी यांचे विविध प्रश्न सोडवण्याबरोबरच अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात जोरदार पुढाकार घेतला आहे. हाच हेतू ठेऊन जळगाव जिल्ह्यात उद्योग व व्यापार वाढून पायाभूत सुविधांचा विकास व पर्यटनासह जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा, याच उद्देशाने एक महत्वपुर्ण विशेष बैठक गुरूवार दि. २२ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत रोटरी भवन, मायादेवी नगर, जळगांव येथे आयोजित केली आहे.
या बैठकीला महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी हे उपस्थित राहणार असून ते उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहे. या बैठकीला जळगांव जिल्ह्यातील उद्योजक, व्यापारी, कृषी उद्योजक उपस्थित राहणार असून बैठकीत प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यातील उद्योग ,व्यापार, वाढीसाठी तसेच विमान व रेल्वे सेवा सुरळीत होणे करिता चर्चा करून पुढील रूपरेषा ठरवण्यात येणार आहे. महाराष्ट्र चेंबरचे जळगाव जिल्ह्यातील सर्व मेंबर्स तसेच सर्व उद्योजक व व्यापारी आणि संस्था यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन गव्हर्निंग कौन्सिल मेंबर संगीता पाटील, दिलीप गांधी,नितीन इंगळे, पुरुषोत्तम टावरी, संजय दादलीका यांच्या वतीने करण्यात आले आहे.