जळगाव मिरर | १० नोव्हेंबर २०२५
जिल्ह्यात गिरणा नदीपात्रातून सुरू असलेल्या वाळू चोरीविरोधात तहसीलदार शीतल राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन दिवसांपासून मोहीम हाती घेण्यात आली आहे. महसूलच्या गस्ती पथकाने तीन डंपर, पाच ट्रॅक्टर अशी आठ वाहने जप्त केली.
जळगाव मंडळ अधिकारी, भोकर, असोदा, पिंप्राळा, मेहरूण, शिरसोली येथील ग्राम महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गिरणा नदीपात्रात गस्त वाढवली आहे. या गस्तीदरम्यान पथकाने ही कारवाई केली. तहसीलदार शीतल राजपूत यांनी स्वतः सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मेहरूण तलावाजवळ पथकासह छापा टाकला. या कारवाईत अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडण्यात आले आणि प्रशासकीय इमारतीच्या आवारात जमा करण्यात आले. दरम्यान, दोन दिवसांत आठ वाहने (५ ट्रॅक्टर आणि ३ डंपर) जप्त केली आहेत. त्यांच्याकडून दंड वसूल केला जाणार आहे.



















