
जळगाव मिरर | १ मे २०२५
राज्यातील कल्याण येथील लेडी डॉन म्हणून ओळखली जाणारी फिजा इराणीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कल्याणच्या डीसीपी स्क्वॉडने आंबिवली इराणी वस्तीमधून फिजा इराणीला अटक केली आहे. तिच्याजवळून पोलिसांनी 1 लाख 16 हजार रुपये किमतीचे एमडी ड्रग्स जप्त केले आहेत. फिजा इराणीवर या पूर्वी देखील ड्रग्स तस्करीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
कल्याण डोंबिवली परिसरात पोलिसांनी ड्रग्स तस्करीविरोधात कारवाई सुरू केली आहे. कल्याण डीसीपी स्क्वॉडला खडकपाडा पोलिस ठाणे अंतर्गत येणाऱ्या आंबिवली परिसरात बेकायदेशीरपणे एमडी ड्रग्स विक्री केले जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे डीसीपी स्क्वॉडच्या पथकाने अटाळी परिसरात सापळा रचला. यावेळी एक महिला स्कूटी घेऊन उभी होती. तिच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी तिला हटकले व तिची झडती घेतली असता तिच्याकडून एक लाख 16 हजार रुपये किमतीचे एमडी ड्रग्स आढळून आले. पोलिसांनी लगेच तिला अटक केली. फिजा इराणी असे आरोपीचे नाव असून ती आंबिवली जवळील कुप्रसिद्ध असलेल्या इराणी वस्तीमध्ये राहते .तिच्या विरोधात खडकपाडा, कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, कल्याण येथील आधारवाडी तुरुंगात एका न्यायालयीन कोठडीतील आरोपीने रागाच्या भरात एका पोलिसाला मारहाण केल्याची घटना सोमवारी घडली होती. या न्यायबंदीला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात एका गुन्ह्यातील सुनावणीसाठी नेले होते. सुनावणीच्या वेळी देखील या न्यायबंदीने न्यायदंडाधिकारी यांच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला होता, असे खडकपाडा पोलिस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे. सुरज शंकर सिंग उर्फ विरेन्द्र शंकर मिश्रा (29) असे या आरोपीचे नाव आहे. तर सुनील पाटील (57) असे मारहाण झालेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे.





















