
जळगाव मिरर । २२ सप्टेंबर २०२५
कार घेण्याकरीता विवाहितेने माहेरुन दोन लाख रुपये आणण्यास विवाहीतेने नकार दिल्याने सासरच्यांकडून तीला मारहाण करण्यात आली. तसेच विवाहिता गर्भवती राहील्याने तीला गर्भपात करण्यासाठी तिचा छळ केला. या छळाला कंटाळून प्रतिक्षा चेतन शेळके (रा. शिरसोली प्र. न. ता. जळगाव) या विवाहितेने सुसाईट नोट लिहून आत्महत्या केली होती. आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील माहेर असलेल्या प्रतिक्षा चेतन शेळके यांचा विवाह चाळीसगाव तालुक्यातील खरजाई येथील चेतन शेळके यांच्यासोबत झाला होता. चारचाकी वाहन घेण्याकरीता विवाहितेने माहेरुन दोन लाख रुपये आणावे यासाठी सासरच्यांकडून तगादा सुरु होता. परंतु विवाहितेने पैसे आणण्यास नकार दिल्यामुळे विवाहितेच्या पतीसह सासरच्यांकडून शिवीगाळ करीत मारहाण करण्यात आली होती. हा प्रकार विवाहितेने माहेरी सांगितला असता, विवाहितेचे वडील हे मुलीला घेण्याकरीता खरजाई येथे गेले होते. याठिकाणी विवाहितेचा मावस सासरा दिनेश पाटील, मावस सासू छाया पाटील यांनी विवाहितेच्या वडीलांसह तिची मोठी बहिण जयश्री यांना देखील मारहाण केली होती.
गेल्या महिनाभरापासून विवाहिता माहेर आल्या होत्या. दरम्यान, विवाहिता गर्भवती असल्यामुळे सासरच्यांकडून तीला गर्भपात करण्यासाठी छळ केला जात होता. त्यामुळे विवाहिता गेल्या काही दिवसांपासून तणावात होती. या त्रासाला कंटाळून दि. १८ रोजी विवाहितेने सुसाईट नोट लिहून आत्महत्या केल्याची घटना घडली होती.
सूसाईट नोटवरुन विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विवाहितेचे वडील भागवत पांडुरंग धामणे (वय ४८, रा. शिरसोली, प्र. न. ता. जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन विवाहितेचा पती चेतन राजेंद्र शेळके, सासरे राजेंद्र नारायण शेळके, सासू वैशाली राजेंद्र शेळके, दीर गौरव राजेंद्र शेळके (सर्व रा. खरजाई, ता. चाळीसगाव) व मामसासरे दिनेश पाटील व मावस सासू छाया दिनेश पाटील (दोघ रा. जारगाव चौफुली, ता. पाचोरा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि अनिल वाघ हे करीत आहे.




















