जळगाव मिरर | १ एप्रिल २०२५
देशातील अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडत असतांना आज एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यात एका फटाक्याच्या कारखान्याला लागलेल्या आगीत १३ कामगारांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत ४ जण जखमी झाले आहेत. आगीनंतर कारखान्यात एकामागोमाग एक स्फोट झाले. कारखान्याचे काही भाग कोसळले. ढिगाऱ्याखाली अनेक कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
बनासकांठाचे जिल्हाधिकारी मिहिर पटेल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “आज सकाळी आम्हाला डीसाच्या औद्योगिक क्षेत्रात स्फोट झाल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. आतापर्यंत कारखान्यातील ढिगाऱ्यातून १३ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. संपूर्ण आरसीसी स्लॅब कोसळला आहे. मदत पथके ढिगारा काढत आहेत. या घटनेत जखमी झालेल्या चार जणांची प्रकृती स्थिर आहे. पोलिस तपास सुरू आहे.”