जळगाव मिरर | २६ डिसेंबर २०२५
महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत नाशिक विभागीय सचिवपदी मयूर बोरसे यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल यथोचित सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
कै. बापुसो. एन. झेड. मराठे विधायक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच स्पेशल ऑलिम्पिक्स भारत (महाराष्ट्र) एरिया डायरेक्टर डॉ. भगवान तलवारे आणि युवा उद्योजक व राष्ट्रीय बॉक्सिंग खेळाडू अभय तलवारे यांच्या शुभहस्ते मयूर बोरसे यांचा सत्कार करण्यात आला.
हा सत्कारसमारंभ शिरपूर येथील कै. बापुसो. एन. झेड. मराठे विधायक संस्था संचलित अनाथ बौद्धिक अक्षम दिव्यांग मुलांसाठी कार्यरत असलेल्या अनाथ मतिमंद मुलांचे बालगृह येथे पार पडला. यावेळी बालगृहाचे मुख्याध्यापक डी. एम. पाटील, विशेष शिक्षक निलेश पाटील, संस्था समन्वयक गणेश निकुम तसेच संस्थेचे इतर कर्मचारी उपस्थित होते.
सत्कारप्रसंगी मान्यवरांनी मयूर बोरसे यांच्या क्रीडा क्षेत्रातील तसेच संघटनात्मक कार्याचे विशेष कौतुक केले. त्यांच्या नेतृत्वाखाली नाशिक विभागातील बॉक्सिंग क्रीडेला नवी दिशा मिळेल आणि नवोदित खेळाडूंना योग्य व्यासपीठ उपलब्ध होईल, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.




















