जळगाव मिरर | ३ एप्रिल २०२५
शहरातील अनेक परिसरातून दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने घडत असतांना आता सिंधी कॉलनी परिसरातून चोरीला गेलेली दुचाकी आणि शहरातील इतर ठिकाणांहून चोरीला गेलेल्या दुचाकींच्या घटना उघडकीस आणण्यात एमआयडीसी पोलीसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना शनीपेठ परिसरातून बुधवारी ४ मार्च रोजी दुपारी २ वाजता अटक करण्यात आले. त्यांच्याकडून १ लाख ४० हजार रुपये किमतीच्या चोरी केलेल्या दोन दुचाकी जप्त केल्या आहेत.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील केमिस्ट भवन परिसरातील रहिवासी यश मनोहरलाल अहुजा (वय २४) यांनी ३१ मार्च रोजी सिंधी कॉलनी सेवामंडळ परिसरातून त्यांची सीबी झेड मोटारसायकल (एम.एच. १९ बीए १७३७) चोरीला गेल्याप्रकरणी गेल्याची तक्रार दाखल केली होती. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी दिलेल्या सुचनेनुसार गुन्हे शोध पथकाने घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला.
तपासादरम्यान, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या फुटेजमध्ये दोन व्यक्ती दुचाकी चोरताना दिसून आले. या फुटेजच्या आधारे तपास करून आकाश संजय मराठे (शनिपेठ पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार) आणि माधव श्रावण बोराडे यांना शनीपेठ परिसरातून अटक केली. पोलिसांनी या दोन्ही आरोपींना अटकेल्यांनतर त्यांच्याकडून एकूण १ लाख ४० हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. यामध्ये तक्रारदार अहुजा यांची सीबी झेड मोटारसायकल आणि जळगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकलचा (एमएच १९ बीटी ६९४५) समावेश आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.