
जळगाव मिरर | १५ एप्रिल २०२५
राज्याच्या राजकारणात खडसे व महाजन यांचा वाद आता काही नवीन राहिलेला नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी एका पत्रकाराच्या व्हिडिओच्या हवाल्याने गिरीश महाजनांवर गंभीर आरोप केले होते. यावर आता गिरीश महाजनांनी एकनाथ खडसे आणि पत्रकार अनिल थत्ते यांना अब्रूनुकसानीची नोटीस पाठवली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, आपल्याला अशी कोणती नोटीस आली नसल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी केला.
मंत्री गिरीश महाजन यांचे एका महिला अधिकाऱ्यासोबत संबंध आहेत, असा आरोप पत्रकार अनिल थत्ते यांनी एका व्हिडिओतून केला होता. एकनाथ खडसे यांनी थत्तेंच्या व्हिडिओच्या हवाल्याने गिरीश महाजनांवर जोरदार टीका केली होती. त्यांच्या या आरोपांमुळे भाजपसह राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. तर गिरीश महाजन यांच्याबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या होत्या. गिरीश महाजन यांनी अनिल थत्ते आणि एकनाथ खडसे यांच्या विरोधात अब्रु नुकसानीची नोटीस बजावली आहे. कोणतेही सबळ पुरावे न देता एकनाथ खडसे आणि पत्रकार अनिल थत्ते यांनी आपल्यावर टीका केली. जनमानसात आपली प्रतिमा मलिन झाली आहे. या विषयात आता आपण कोर्टातच लढणार असून आपल्या वकिलाच्या माध्यमातून नोटीस दिली असल्याचे गिरीश महाजन म्हणाले.
दरम्यान, गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना आपल्या वकिलाच्या माध्यमातून नोटीस दिली असल्याचा दावा केला असला, तरी अशा प्रकारची कोणतीही नोटीस आपल्याला मिळाली नसल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. एकनाथ खडसे म्हणाले होते की, गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांनी आपली एक क्लिप प्रकाशित केली. त्यात असे म्हटले आहे की, गिरीश महाजन यांच्या ‘रंगला रात्री अशा’, त्यात त्यांनी डिटेल सांगितले आहे की, गिरीश महाजन यांचे एका महिला आयएएस अधिकाऱ्यासोबत संबंध आहेत. तिचे नाव मला माहित आहे. पण ते सांगणे उचित होणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
अमित शहा यांच्याकडे ज्यावेळेस मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी चर्चा झाली. त्यावेळेस अमित शहा यांनी गिरीश महाजन यांना बोलावून घेतले होते. त्यांना सांगितले की, महिला आयएएस अधिकाऱ्यांशी तुझे संबंध आहे. यावेळी महाजनांनी सांगितले की, नाही, माझे अनेकांशी कामानिमित्त संबंध आहेत. कामानिमित्त मी बोलतो. अमित शाह यांनी त्यांना सांगितले की, तुझे कॉल डिटेल रिपोर्ट आमच्याकडे आहे. रात्री एक वाजेनंतर दिवसभरात शंभर शंभर कॉल तुझे झालेले आहेत. त्यामुळे तू आता काहीही सांग. पण, तुझे सीडीआर खरे बोलतो. रोज बोलण्याचे काय कारण आहे? असे प्रश्न अनिल थत्तेंनी शहांच्या वक्तव्याचा हवाला देऊन उपस्थित केले, असेही एकनाथ खडसे म्हणाले.




















