जळगाव मिरर | ५ डिसेंबर २०२३
मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील नुकतेच जळगाव जिल्हा दौऱ्यावर असतांना त्यांनी नुकतीच मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदार संघात सभा घेत जोरदार सरकारवर हल्लाबोल केला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले कि, मंत्री गिरीश महाजन शब्द पाळत नसतील तरी चालेल, पण आड तरी येऊ नका, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. आमच्यात आणि आपल्यात (सरकार) मध्ये काय ठरले आहे, ते तुम्हाला चांगलेच माहिती असून आता तर आमच्या नोंदी सरकारी दप्तरी सापडल्या आहेत. आम्हाला तुमच्याबद्दल आदर आहे. आम्ही तुम्हाला मानतो, तुमच्या म्हणण्यानुसार आम्ही आंतरवाली सराटीतील आंदोलन मागे घेतले आहे.
दुसऱ्यांदा मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून आंदोलन मागे घेतले. आता शब्दांचा खेळ करू नका, तुम्ही मुदत वाढवून मागितली. आम्ही ४० दिवसांची मुदत वाढवून दिली. एवढ्यात होत नाही असे म्हटल्यानंतर पुन्हा २४ डिसेंबरपर्यंत आरक्षणाची मुदत वाढवून दिली. आता गप्पा मारू नका, मराठ्यांना आरक्षण देतो म्हणून सरकारने सांगितले आहे. महाराष्ट्रातील मराठ्यांनी ते सर्व पाहिले आहे. म्हणून सांगतो महाजन साहेब आमच्या आड येऊ नका, आमच्या अन्नात माती कालवू नका, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.
जामनेर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने शहरातील भुसावळ चौकात ४ रोजी मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. सभास्थळी व शहरातील मुख्य मार्गावर जेसीबीच्या साहयाने मनोज जरांगे पाटील यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. जरांगे पाटील पुढे म्हणाले की, मी खान्देशसह विदर्भातील माझ्या रक्ताच्या मराठा बांधवांच्या आरक्षणास समर्थन मिळवण्यासाठी आलो आहे. तुमच्या एका भावाला आरक्षण असून दुसऱ्या भावाला नाही. त्यासाठी तुमचे समर्थन आवश्यक आहे. संपूर्ण देशात व महाराष्ट्रात कोणत्याही नेत्याने महापुरुषांची जात कधीही काढली नाही. सरकारमध्ये एक जबाबदार मंत्री असलेल्या या महाशयाने एका क्षुल्लक कारणावरून महापुरुषांची जात काढली. म्हणजे हा महाशय स्वतःला महापुरुषांपेक्षा मोठा समजायला लागला काय, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी ना. छगन भुजबळ यांना लगावला. आम्ही एनटी, व्हिजेएनटी, धनगर आणि वंजारी समाजाचे आरक्षण मागत नाही. आम्ही एससी, एसटीचे ही आरक्षण मागत नाही. तर आम्ही मागतो आहे .
आमच्या हक्काचे ओबीसी आरक्षण. आमचा धनगर समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा आहे. त्यामुळे धनगर आणि वंजारी समाजाने कोणाच्या सांगण्यावरून आमच्या विरोधात आंदोलन करू नये. आपण गावागावात लहान, भाऊ मोठे भाऊ म्हणून गुण्या गोविंदाने राहत आहोत. त्यात विष कालवण्याचे काम काही लोक करत आहे. त्यांना गर्दी जमवण्यासाठी तुमची गरज पडत आहे. त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन करत ते भुसावळकडे मार्गस्थ झाले. या वेळी हजारोंच्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.