जळगाव मिरर | १९ डिसेंबर २०२५
अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने रस्त्याने जात असलेल्या मोहम्मद आदिल मजील अन्सारी (वय १५, रा. कांचन नगर) या मुलावर हल्ला केला. त्याला दगडांनी मारहाण करीत गंभीर जखमी केले. यामध्ये आदिलच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास बळीराम पेठेत घडली. दोन दिवस उलटले तरी पोलिसांकडून याप्रकरणी कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील कांचननगर भागात आदिल मोहम्मद मजील अन्सारी हा मुलगा वास्तव्यास आहे. मंगळवार दि. १६ रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास बळीराम पेठेतून घराकडे जात असतांना काहीही कारण नसतांना टोळक्याने त्याला रस्त्यात अडविले. त्याला सायकलवरुन खाली ओढत त्याच्या मारहाण करण्यास सुरुवात केली. लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत आदीलच्या चेहऱ्यावर दगडांनी मारहाण करीत गंभीर जखमी केले. यामध्ये त्याच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी अवस्थेत आदिल याला तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.
मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या आदिलला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात घटेनेची माहिती दिली. त्यावेळी संबंधित पोलीस कर्मचारी रुग्णालयात देखील गेला. परंतू जखमीच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत असल्यामुळे तो बोलू शकत नव्हता. दरम्यान, दोन दिवस उलटले तरी याप्रकरणी पोलीसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नव्हती.
सद्या शहरातील गुन्हेगार हे अल्पवयीन मुलांची टोळी तयार करुन त्यांच्याकडून गुन्हे घडवून आणत असल्याच्या घटना उघडकीस येत आहे. ही घटना देखील त्याच पद्धतीने झाली झाल्याची चर्चा सुरु आहे. पोलीसात तक्रार न देण्याकरीता संबंधित टोळक्याकडून धमक्या मिळत नसल्याने जखमींच्या नातेवाईक तक्रार देण्यास टाळाटाळ करीत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.




















