जळगाव मिरर | ७ एप्रिल २०२५
शेतालगत असलेल्या नाल्याजवळ बोलावून त्याठिकाणी पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार केला. त्यातून ती मुलगी गर्भवती राहून तीने बाळाला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अत्याचार करणारा तरुण नात्यातीलच असल्याची घटना तालुक्यातील एका गावात घडली. या प्रकरणी अत्याचार करणाऱ्या गणेश अशोक बोरसे याला अटक करण्यात आली असून त्याला दि. ९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी वास्तव्यास आहे. त्या मुलीच्या नात्यातीलच गणेश बोरसे याने गावठाण परिसरातील शेतालगतच्या नाल्याजवळ बोलविले होते. त्याठिकाणी त्या संशयिताने बळजबरीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर याविषयी कोणाला काहीही न सांगण्याची धमकीदेखील त्याने या मुलीला दिली. तो वेळोवेळी मुलीला नाल्याजवळ बोलवून तिच्यावर अत्याचार करीत राहिला. त्यामुळे अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तिची प्रसूती होऊन तिने एका बाळाला जन्म दिला.
या प्रकरणी अल्पवयीन मुलीने तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गणेश बोरसे याच्याविरुद्ध बलात्कार, पोस्को कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक करण्यात आले. पुढील तपास पोउनि अमोल पवार करीत आहे. अटक केलेल्या तरुणाला रविवारी न्यायालयात हजर केले असता दि. ९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.