
जळगाव मिरर | २८ मे २०२५
गेल्या काही दिवसापासून राज्यात घडलेल्या घडामोडींमधून महिला अत्याचाराची अनेक प्रकरणं उघडकीस आल्यानंतर आता पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजंच असताना राज्यातील इतरही जिल्ह्यांमधून तशी प्रकरणं समोर येत आहेत. मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलावर एका महिलेनं आरोप केला, नंतर त्या प्रकरणात ट्वीस्ट आला. तर दुसरीकडे आता भाजप नेते परिणय फुके यांच्या भावजय प्रिया फुके यांनीही आपली कैफियत माध्यमांसमोर मांडली.
फुके कुटुंबावर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. भाजपचे विधान परिषदेचे सदस्य परिणय फुके यांच्या भावजयी प्रिया फुके यांनी थेट पत्रकार परिषद घेत सासरकडच्या मंडळींवर छळ, धमक्या आणि फसवणुकीचे गंभीर आरोप केले आहेत. शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी प्रिया फुके यांची भेट घेऊन पत्रकार परिषद घेतली.
प्रिया फुके म्हणाल्या, “मी गेल्या दीड वर्षांपासून न्यायासाठी लढतेय, पोलिस ठाण्यांचे हेलपाटे मारले, पण कोणीच मदतीला आले नाही. आज या दोन भगिनींनी (अंधारे आणि खडसे) माझ्या लढ्यात साथ दिली.”
प्रिया फुके यांचे आरोप काय?
- “२०१२ मध्ये संकेत फुके यांच्याशी माझं लग्न झालं, पण आम्हाला त्यांच्या किडनी प्रत्यारोपणाची माहिती लग्नाआधी देण्यात आली नव्हती.”
- “लग्नानंतर जेव्हा मी प्रश्न विचारले, तेव्हा मला आणि माझ्या कुटुंबाला इजा पोहोचवण्याच्या धमक्या दिल्या गेल्या.”
- “बलात्कारासाठी माणसं पाठवू, अशी घाणेरडी भाषा वापरली गेली.”
- “पतीच्या निधनानंतरही त्रास सुरूच होता, संपत्तीवरून वाद झाले आणि एके रात्री मला घराबाहेर काढण्यात आलं.”
- “आजही धमक्या येतात, माझ्या मागावर लोक पाठवले जातात.”
नेत्यांची भूमिका:
रोहिणी खडसे म्हणाल्या, “प्रिया फुके यांना न्याय मिळाला पाहिजे. महिला आयोगाने वेळेवर मदत केली असती, तर हे प्रकरण इथवर आलं नसतं.” सुषमा अंधारे यांनीही प्रिया फुके यांचा आवाज बुलंद करत प्रशासनाने याची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी केली.