जळगाव मिरर | १२ मार्च २०२४
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नुकतेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिक येथे वर्धापन दिनाला कार्यकर्त्यांना संयम ठेवायला लावला होता, त्यानंतर लागलीच पुणे मनसेत अंतर्गत गटबाजी सुरू असल्याचं समोर आलं आहे. त्यामागचं कारणही तसंच आहे. पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांनी सोमवारी दि.११ रात्री एक फेसबुक पोस्ट केली आहे. मर्यादेच्या बाहेर त्रास केल्यानंतर माणूस शांत होतो, असा मजकूर वसंत मोरे यांनी फेसबुकवर लिहला आहे.
आता आपली कुणाकडूनही काहीही अपेक्षा नाही असं देखील वसंत मोरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.त्यांच्या या पोस्टमुळे पुणे मनसेत सर्वकाही अलबेल नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. राज ठाकरे यांचे विश्वासून आणि पुण्यातील कट्टर मनसैनिक म्हणून वसंत मोरे यांची ओळख आहे.
वसंत मोरे हे नेहमी त्यांच्या धडाडीच्या कार्यशैलीसाठी ओळखले जातात. पुणे महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करताना त्यांनी आपला वेगळाच ठसा उमटवला आहे. त्याचबरोबर पुण्यात मनसे पक्षाच्या विस्तारामागे देखील वसंत मोरे यांचा मोठा हातभार आहे.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून वसंत मोरे हे पक्षांतर्गत संघर्षामुळे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. यासंदर्भात वसंत मोरे यांनी अनेकदा फेसबुक पोस्ट करत आपली खदखद व्यक्त करून दाखवली आहे. सोमवारी मध्यरात्री देखील वसंत मोरे यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो. त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो, असं मोरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. त्यामुळे इतरांच्या समस्या सोडवण्यासाठी कायमच पुढे असणाऱ्या वसंत मोरे यांना स्वतःला कुणाचा त्रास आहे? त्यांची कोंडी कुणी करतंय? हे असे अनेक प्रश्न आता विचारले जात आहेत.