जळगाव मिरर | ११ सप्टेंबर २०२५
गेल्या काही महिन्यापासून मराठीच्या मुद्यावरून आक्रमक झालेल्या राज ठाकरे यांच्या मनसेने आता आपला मोर्चा टीव्ही कार्यक्रमांत मुंबईचा उल्लेख बॉम्बे असा करणाऱ्यांकडे वळवला आहे. मनसेने या प्रकरणी कॉमेडियन कपील शर्मा याला आपल्या शोमध्ये मुंबईचा उल्लेख बॉम्बे असा न करण्याचा इशारा दिला आहे. बॉम्बेचे मुंबई असे नामकरण होऊन तब्बल 30 वर्षे झालीत, अशी आठवण मनसेने यासंबंधी कपील शर्माला करून दिली आहे.
राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्यावर अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी शालेय शिक्षणात हिंदीच्या सक्तीला कडाडून विरोध केला. त्यानंतर राज्य सरकारला ही सक्ती मागे घ्यावी लागली. तत्पूर्वी, त्यांनी बँकांच्या व्यवहारातही मराठीचा आग्रह धरला. त्याचेही राज्यभरात तीव्र पडसाद उमटले. त्यानंतर आता मनसेने आपला मोर्चा विविध टीव्ही कार्यक्रमांत सातत्याने मुंबईचा उल्लेख बॉम्बे असा करणाऱ्यांकडे वळवला आहे. मनसेच्या चित्रपट आघाडीचे प्रमुख अमेय खोपकर यांनी एका ट्विटद्वारे यासंबंधी कॉमेडियन कपील शर्मा याला निर्वाणीचा इशारा दिला आहे.
अमेय खोपकर गुरूवारी आपल्या एका ट्विटमध्ये म्हणाले की, बॉम्बेचे मुंबई अधिकृत नामकरण होऊन 30 वर्षे झाली. त्यानंतरही बॉलिवूड मधील कपिल शर्मा शो मध्ये सेलिब्रिटी गेस्ट, दिल्लीस्थित राज्यसभा खासदार, शो अँकर आणि अनेक हिंदी चित्रपटात सर्रास बॉम्बे हा उल्लेख होत आहे. 1995 महाराष्ट्र शासन व 1996 मध्ये केंद्र शासनाची अधिकृत मान्यता मिळून चेन्नई, बंगळुरू, कोलकाताच्याही आधी मुंबई झाले आहे. तरी याचा मान राखून मुंबई उल्लेख करावा हा विनंती वजा इशारा देण्यात येत आहे.
अमेय खोपकर यांनी आपल्या पोस्टमध्ये एक व्हिडिओही जोडला आहे. त्यात अभिनेत्री हुमा कुरेशी मुंबईचा उल्लेख बॉम्बे म्हणून करताना दिसून येत आहे. खोपकर यांनी ‘बॉम्बे टू मुंबई’ असा हॅशटॅगही आपल्या ट्विटमध्ये वापरला आहे.