‘सायन्स टेक@वर्क’ कृषीमहोत्सवाला मध्यप्रदेशचे हॉर्टिकल्चर मंत्री नारायन सिंह कुशवाह यांची भेट
जळगाव मिरर | २४ जानेवारी २०२६
कमी श्रमात, कमी जागेत, कमी पाण्यात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले पाहिजे यासाठी ठिबक, स्प्रिंकलर, ऑटोमेशन, प्रिसीजींग फार्मिंग, अतिसघन फळबागांची लागवड करून प्रक्रिया उद्योगांवर भर दिला पाहिजे. याच्या अवलंबनातूनच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल, तसेच ग्रामीण स्तरावर रोजगार वाढेल परिणामी स्थलांतर थांबू शकेल. त्यासाठी तरूणांनी आपल्याकडील ज्ञानाचा उपयोग हा शेतीमध्ये असलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी केला पाहिजे, ते प्रत्यक्ष जीवनात उतरविले तर आर्थिकदृष्ट्या सामाजिक परिवर्तन घडेल, यासाठी जैन इरिगेशनच्या जैन हिल्स येथील कृषी संशोधन प्रात्यक्षिक केंद्रावर सुरू असलेल्या ‘सायन्स टेक@वर्क’ या हायटेक शेतीच्या नव्या हुंकार कृषिमहोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहन करीत नव्या भारताच्या विकासाचा राजमार्ग यात असल्याचे मध्यप्रदेश राज्याचे सामाजिक न्याय आणि दिव्यांगजन कल्याण, उद्यानिकी तथा खाद्य प्रसंस्करण मंत्री नारायण सिंह कुशवाह यांनी प्रतिपादन केले.
जैन हिल्स येथे सुरू असलेल्या कृषी महोत्सवाला शेतकऱ्यांकडून मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादामुळे हा महोत्सव १४ जानेवारी ऐवजी आता ३० जानेवारी पर्यंत वाढविण्यात आलेला असला तरी यात सर्व शेतीविषयक आधुनिक प्रयोग शेतकरी, अभ्यासकांना पाहता येण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
जळगाव येथील जैन हिल्सवर सुरू असलेल्या कृषी महोत्सवास मंत्री नारायण सिंह कुशवाह यांनी आज भेट दिली. जैन इरिगेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके, डॉ. के. बी. पाटील, डॉ. बी. के. यादव, डॉ. अनिल पाटील, विवेक डांगरीकर, गिरीष कुलकर्णी आणि शास्त्रज्ञांशी त्यांनी संवाद साधला त्यांनी विविध प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत दिल्लीच्या अॅग्री इंडस्ट्रीज विकास चेंर्बस व्यवस्थापकिय संचालक मनोज गुप्ता, मध्यप्रदेशचे भाजपा महामंत्री राघवेंद्र यादव, अरविंद सोनगिरकर, रामविजय यादव उपस्थित होते. जैन ऑटोमेशन, स्मार्ट फिल्टर, न्यूट्रीकेअर, एचडीपीई पाईपसह फिटिंग्जस मधील सर्व उत्पादनांची माहिती त्यांनी घेतली. जैन स्प्रिंकलरचा प्रत्यक्ष शेतातील उपयोग समजून घेतला. क्षारपड जमिनीच्या सुधारणेसाठी जैन सबसरफेस ड्रेनेज सिस्टीमचे तंत्र, शेतीमध्ये परिवर्तन आणणारे आणि भविष्य घडविणारे जैन क्लायमेंट स्मार्ट टेक्नॉलाजी समजून घेतले. ‘सेवन इन डबलिंग’मध्ये ऊसासह अन्य पिकांचे उत्पन्न कसे वाढविता येते याची प्रत्यक्ष माहिती घेतली. फळबागांसाठी अतिसघन लागवड पद्धत हे नवीन तंत्रज्ञान किती व कसे प्रभावी आहे, यावर शास्त्रज्ञांशी संवाद साधला. जैन इरिगेशनद्वारे राबविण्यात येणाऱ्या सौर कृषी पंप, टिश्यूकल्चर रोपे व फलोत्पादनाच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक विकास साध्य होत असल्याचे मंत्री नारायण सिंह कुशवाह यांनी प्रत्यक्ष पाहिले. मध्यप्रदेशात या कार्याला प्राधान्यक्रम देऊन काही नवीन उपक्रम राबविता येऊ शकतात का, यासाठी हा खास दौरा आयोजित करण्यात आला होता. फ्युचर फार्मिंग, फळप्रकिया उद्योग, जैन फूडपार्क, जैन हायटेक प्लांट फॅक्टरी टाकरखेडा, जैन प्लास्टिक पार्क या प्रकल्पांची पाहणी करून माहिती घेतली. मातीविरहीत रोगमुक्त रोपं जी नियंत्रतीत वातावरणातील मातृवृक्षांपासून तयार केली जातात त्याचीही माहिती त्यांनी यावेळी घेतली. यावेळी त्यांनी सिक्किमचे विद्यार्थी तसेच राजस्थान, मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांशी संवाद देखील साधला.
आधुनिक कृषितंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपयुक्त
मध्यप्रदेशात जैन इरिगेशनचे आधुनिक कृषी तंत्रज्ञान उपयोगात आणले जात आहे. सूक्ष्मसिंचन, ठिबक सिंचन व स्प्रिंकलर प्रणाली भाजी-पाला बटाटा, मिरची, फलोत्पादन टिश्यूकल्चर केळी रोपे, कांदा, आंबा, मोसंबी यात व्यापक प्रमाणात उपयोग होतो. त्यासाठी मध्यप्रदेश शासनाच्या विविध योजना देखील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहेत. यामुळे शेतकऱ्यांना पाणी बचत, उत्पादनवाढ व गुणवत्तापूर्ण पीक घेण्यास मदत झाली आहे. कृषी क्षेत्रातील नवकल्पना, शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी विकासाला नवे बळ प्राप्त झाले. राज्यातील कृषी क्षेत्राचा शाश्वत विकास व आधुनिकतेसाठी जैन इरिगेशनचे योगदान महत्त्वपूर्ण ठरत आहे. शास्त्रोक्तपद्धतीने लागवड केलेल्या गहू, भात, मका, फळबाग, भाजीपाला पिके यासह अन्य पिकांची विज्ञान व तंत्रज्ञान यांची जोड देत जैन हिल्सवर प्रात्यक्षिके उभी आहेत. याचा वापर करुन शेतकरी आपल्या शेतीतील उत्पन्न वाढीसाठी फायदा घेऊ शकतात. असेही मंत्री नारायण सिंह कुशवाह आपल्या भेटीच्या वेळी म्हणाले.




















