जळगाव मिरर | २१ जुलै २०२५
राज्यातील अनेक शहरातील तरुण तरुणी टोकाचे पाऊल उचलत असल्याच्या घटना सातत्याने घडत असतांना आता नाशिक जिल्ह्यातील आडगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका २० वर्षीय विद्यार्थिनीने, ‘आई माझ्या शिक्षणाचा त्रास नको घेऊ’, अशी भानविक चिठ्ठी लिहित जीवन संपवले आहे. सदर मुलीचे आई पोलिस अंमलदार आहे. तिने गळफास घेण्यापूर्वी आईला चिठ्ठी लिहिली आहे. पूजा दीपक डांबरे (२०, रा. विहंग अपार्टमेंट, व्ही. डी. कामगारनगर, अमृतधाम, पंचवटी) असे त्या विद्यार्थिनीचे नाव आहे. या घटनेने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
पूजा नुकतीच बारावी पास झाली. तिने प्रथम वर्षात प्रवेश घेत महाविद्यालयीन शिक्षणही सुरु केले होते. पूजाचे वडील विभक्त राहत असून ती आईसोबत राहात होती. ‘आई तुला त्रास द्यायचा नाही. माझा शैक्षणिक खर्च फार आहे. तू टेन्शन घेऊ नकोस. तुझी धावपळ होते,’ असे मुलीने चिठ्ठीत लिहिले आहे. या प्रकरणी अधिक चौकशी सुरु आहे.
कौटुंबिक अडचणी आणि मानसिक तणावामुळे पूजा गेल्या काही दिवसांपासून खचून गेली होती. आईवर तिचे जीवापाड प्रेम होते. मात्र, आई पोलिस खात्यात कार्यरत असल्याने दोघींवर कौटुंबिक आणि घरच्या जबाबदाऱ्यांचा ताण होता. या तणावातूनच शुक्रवारी (दि. १९) सायंकाळी आठपूर्वी पूजाने राहत्या घरातील हॉलमध्ये गळफास घेऊन जीवन संपवले.
हा प्रकार लक्षात येताच तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. याबाबत आडगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
