जळगाव मिरर | १९ जानेवारी २०२६
अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरत असल्याच्या कारणातून आपल्या पाच वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या करणाऱ्या आईला भोपाळ न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ज्योती राठोड असे या दोषी महिलेचे नाव असून, या घटनेने संपूर्ण समाजमन सुन्न झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती राठोड हिचा पती ध्यानसिंग राठोड हे पोलीस दलात कार्यरत आहेत. ज्योतीचे शेजारी राहणाऱ्या उदय नावाच्या तरुणाशी अनैतिक प्रेमसंबंध होते. २८ एप्रिल २०२३ रोजी तिचा पाच वर्षांचा मुलगा जतिन याने आईला उदयसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते. हे सर्व वडिलांना सांगेल, या भीतीने ज्योतीने अत्यंत क्रूर निर्णय घेतला.
तिने जतिनला घराच्या दुसऱ्या मजल्यावरील छतावरून खाली फेकले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या जतिनचा उपचारादरम्यान २४ तासांच्या आत मृत्यू झाला. सुरुवातीला ही घटना अपघात असल्याचा बनाव करण्यात आला होता.
मात्र, घटनेनंतर सुमारे १५ दिवसांनी ज्योतीने पश्चात्तापातून पतीसमोर गुन्ह्याची कबुली दिली. मुलाच्या मृत्यूनंतर ध्यानसिंग यांना आधीच संशय आला होता. त्यांनी पत्नीशी झालेल्या संभाषणाचे ऑडिओ व व्हिडिओ रेकॉर्डिंग केले होते, तसेच घरातील सीसीटीव्ही फुटेजही गोळा केले होते. हे सर्व पुरावे घेऊन त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी ज्योती राठोड आणि तिचा कथित प्रियकर उदय यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. खटल्यादरम्यान सादर करण्यात आलेल्या परिस्थितीजन्य व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने ज्योतीला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मात्र, उदयविरुद्ध ठोस पुरावे न मिळाल्याने न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली.
सरकारी वकील धर्मेंद्र शर्मा यांनी सांगितले की, “पतीच्या तक्रारीनंतर आणि सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीतून आरोपी महिलेचा गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट झाला. न्यायालयाने परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे दोष निश्चित केला.”




















