
जळगाव मिरर / २१ मार्च २०२३
राज्यातील तरुणांनी पोलीस सेवेत भरती होण्यासाठी मैदानी परीक्षा झाल्यानंतर तब्बल अडीच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा जाहीर करण्यात आली आहे. शिपाई आणि चालक पदासाठी २६ मार्चला लेखी परीक्षा होणार आहे. मुंबई वगळता पूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा होत आहे.या संदर्भातील माहिती पोलीस महसंचालक संजय कुमार यांनी दिली आहे. लेखी परीक्षा 90 मिनिटांची व 100 गुणांची असेल. त्याचे स्वरूप ‘ऑब्जेक्टिव्ह’ असेल.
लेखी परीक्षेचे केंद्र निश्चित करण्यात येत आहे. पात्र उमेदवारांना एमएच-आयटीकडून परस्पर हॉल तिकीट उपलब्ध केले जाणार आहे. ज्या शाळा, महाविद्यालय इमारतीत तसेच वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध आहेत, तेथे परीक्षेची व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती आहे. अन्यथा प्रत्येक वर्गात स्वतंत्र व्हिडिओग्राफर नियुक्त केला जाणार आहे. परीक्षेच्या दिवशी वेळेच्या 2 तासापूर्वी उमेदवारांना परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यासाठी सांगण्यात आले आहे. मैदानी चाचणीसाठी उपस्थित असलेल्या उमेदवारांचे छायाचित्र व अंगठय़ाचा ठसा पोलिसांनी नोंदवून घेतलेला आहे. लेखी परीक्षेसाठी उपस्थित राहणारे उमेदवार तेच आहेत का, याची खातरजमा केली जाणार आहे. त्यामुळे गैरप्रकारांना आळा बसणार आहे.