
महापौर दीपमाला काळे यांचा कर्मचाऱ्यांना अपडेट राहण्याचा इशारा
जळगाव मिरर | ११ मार्च २०२६
जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांनी मंगळवार, १० फेब्रुवारी रोजी सकाळी नेरी नाका स्मशानभूमीची आकस्मिक पाहणी केली. महापौरांनी परिसराची स्वच्छता आणि रंगरंगोटी संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण आदेश दिले होते. या कामाची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
रंगरंगोटी आणि सुशोभीकरण
स्मशानभूमीच्या परिसरात स्वच्छता आणि नीटनेटकेपणा राहावा, यासाठी महापौरांनी संपूर्ण परिसराला पांढरा आणि पिवळा रंग देण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच परिसरातील झाडांना गेरूने रंगकाम करण्याचे आदेशही त्यांनी दिले होते. पाहणीदरम्यान, केवळ बाह्य रूपच नव्हे, तर स्मशानभूमीतील वाढलेल्या झाडांच्या फांद्या छाटून परिसर लवकरात लवकर स्वच्छ करावा, असेही त्यांनी सांगितले.
सुरक्षारक्षकांची काढली खरडपट्टी
पाहणीदरम्यान स्मशानभूमीतील वस्तू चोरीला जात असल्याच्या तक्रारी कर्मचाऱ्यांनी महापौरांकडे केल्या. यावर महापौरांनी संताप व्यक्त करत उपस्थित सुरक्षारक्षकांची चांगलीच खरडपट्टी काढली. “यापुढे जर इथून एकही वस्तू चोरीला गेली, तर थेट तुमच्यावरच कायदेशीर कारवाई केली जाईल,” असा कडक इशारा त्यांनी दिला.
प्रशासकीय आणि तांत्रिक सूचना
महापौर काळे यांनी यावेळी इतरही महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष वेधले.
CCTV ताबा: सध्या स्मशानभूमीतील सीसीटीव्ही फुटेज रोटरी क्लबकडे आहे, ते तातडीने महानगरपालिकेच्या ताब्यात घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
भंगार हटाव: परिसरात पडलेले अनावश्यक भंगार त्वरित हटवून जागा मोकळी करण्याचे आदेश दिले.
विद्युत सुरक्षा : छतावर आणि परिसरात लोंबकळणाऱ्या उघड्या वीजवाहिन्या (वायरी) चेक करून, अनावश्यक वायरी काढून टाकण्याचे निर्देश त्यांनी दिले.
संरक्षित भिंत: स्मशानभूमीच्या संरक्षित भिंतीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी बांधकाम विभागाला सूचना केल्या.
या पाहणी दौऱ्यावेळी महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाचे अभियंता योगेश वाणी यांच्यासह इतर संबंधित कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. नागरिकांना स्मशानभूमीत आल्यावर कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, याची दक्षता घेण्याचे आवाहन महापौरांनी शेवटी केले.




















