
जळगाव मिरर | १ डिसेंबर २०२५
राज्यातील महामार्गांवरील अपघातांच्या मालिकेत आणखी एक भीषण दुर्घटना समोर आली आहे. विवाहसोहळ्यानंतर नवदाम्पत्याला घेऊन तुळजापूरला देवदर्शनासाठी निघालेल्या कारला भरधाव ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. हा अपघात रविवारी (दि. ३०) सायंकाळी बार्शी–लातूर राष्ट्रीय महामार्गावरील घारी शिवारात घडला.
या भीषण धडकेनंतर कार पुलावरून खाली कोसळून तीन-चार वेळा पलटी झाली. कारचा पूर्णतः चक्काचूर झाला असून ट्रकचेही मोठे नुकसान झाले आहे. मृतांमध्ये गौतम भगवान कांबळे (६५), जया गौतम कांबळे (६०), नवरीची मावशी (रा. पनवेल), सारिका संजय वाघमारे (४५) आणि संजय तुकाराम वाघमारे (५०, मार्केट यार्ड वाघवस्ती, कुर्डूवाडी) यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चार दिवसांपूर्वी विवाह झाल्यानंतर नवदाम्पत्य हे पनवेलहून कुर्डूवाडीमार्गे तुळजापूराला देवदर्शनासाठी जात होते. जांभळबेट येथील पुलाजवळील वळणावर समोरून येणाऱ्या भरधाव मालट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. अपघातात कारमधील सात पैकी पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर नवविवाहित अनिकेत गौतम कांबळे (२८) आणि मेघना अनिकेत कांबळे (रा. पनवेल) हे सुदैवाने बचावले. त्यांना बार्शी येथील जगदाळे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघात झालेल्या पुलावर गार्ड स्टोन नसल्याचे दिसून आल्याने स्थानिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.




















