जळगाव मिरर | २५ ऑक्टोबर २०२५
रत्नागिरी येथे सुरू असलेल्या ३५ व्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर कुमार गट अजिंक्यपद तायक्वांडो स्पर्धेत जळगावची तायक्वांडोपटू निकिता दिलीप पवार (जैन स्पोर्टस् अकॅडमी तसेच जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन) हिने मुलींच्या ५५ किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले. या शानदार कामगिरीमुळे निकिताने बेंगळुरू येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघात स्थान निश्चित केले आहे.
याआधीही निकिताने नुकत्याच झालेल्या शालेय राज्य तायक्वांडो स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठीही पात्रता मिळवली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामागे प्रशिक्षक जयेश बाविस्कर व अजित घारगे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
निकिताच्या या यशाबद्दल जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे अध्यक्ष श्री. अतुलभाऊ जैन, उपाध्यक्ष श्री. ललित पाटील, खजिनदार श्री. सुरेश खैरनार, सचिव श्री. अजित घारगे, सहसचिव श्री. रविंद्र धर्माधिकारी, सदस्य श्री. नरेंद्र महाजन, श्री. कृष्णकुमार तायडे, श्री. महेश घारगे, श्री. सौरभ चौबे तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमीचे श्री. अरविंद देशपांडे यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.




















