जळगाव मिरर | ११ नोव्हेंबर २०२५
जळगाव शहरातील रामराज्य बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीन तुळशीराम जाधव यांनी प्रभाग क्रमांक ९ मधून नगरसेवक पदासाठी निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. मागील दहा वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक आणि नागरिकांच्या समस्या सोडविण्याच्या क्षेत्रात सक्रिय सहभाग घेतल्याने त्यांनी प्रभागात ठसा उमटवला आहे.
कोरोना काळात नागरिकांसाठी जेवण वितरण, सॅनिटायझर फवारणी आणि आरोग्यसुरक्षेची काळजी घेण्याचे काम जाधव यांनी जीवाची पर्वा न करता केले. त्याचप्रमाणे २६ जानेवारी गणराज्य दिनानिमित्त प्रभागातील गरीब विद्यार्थ्यांना वह्या आणि शैक्षणिक साहित्य वाटप करून सामाजिक सलोख्याचा संदेश दिला. रामराज्य बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून मागील आठ वर्षांपासून अनेक उपक्रम राबवून नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवला आहे. नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी नेहमीच अग्रक्रमाने काम केले आहे, असे त्यांनी सांगितले.
जाधव म्हणाले, “आपल्या प्रभागातील प्रत्येक नागरिकाचा विश्वास जपणे आणि सर्वसमावेशक विकास साधणे हेच माझे ध्येय आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नागरिकांनी माझ्या पाठीशी राहून सहकार्य करावे,” असे आवाहन त्यांनी केले.



















