जळगाव मिरर | २९ नोव्हेंबर २०२३
देशभरात आगामी काळात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असताना बुधवारी पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे एका रॅलीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठं वक्तव्य केले आहे. या रॅलीत शाह यांनी पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारवर देखील गंभीर आरोप केले.
केंद्रीय गृहमंत्री शाह म्हणाले कि, आम्ही CAA कायदा आणणारच. हा देशाचा कायदा असून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही, पुढील सरकार भाजपाच बनवणार असे बंगालच्या जनतेने ठरवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगालच्या जनतेला लाखो रुपये पाठवतात. पण तृणमूल काँग्रेस हे पैसे गरिबांपर्यंत पोहोचू देत नाही. बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान सर्वाधिक हिंसाचार होतो. घुसखोरी थांबवली जात नाही. बॉम्बस्फोटाचे आवाज येत आहेत.
अमित शाह म्हणाले, बंगालमध्ये कम्युनिस्टांनी २७ वर्षे राज्य केले. तिसऱ्या टर्ममध्ये ममता बॅनर्जी यांचे सरकार आले. दोघांनी मिळून बंगालला संपवले. ममता बॅनर्जी बंगालमधील घुसखोरी रोखू शकल्या नाहीत. राज्यात घुसखोरांना मतदार कार्ड आणि आधार कार्ड खुलेआम वाटले जात आहे. कम्युनिस्टांना हटवून ममता दीदी सत्तेवर आल्या पण बंगालमध्ये बदल झाला नाही. आजही बंगालमध्ये घुसखोरी, तुष्टीकरण, राजकीय हिंसाचार आणि भ्रष्टाचार होत आहे. ज्या बंगालमध्ये एकेकाळी रवींद्र संगीत ऐकू येत होते, ते आज बॉम्बस्फोटांनी गुंजत आहे.
शाह म्हणाले, संपूर्ण देशातून गरिबी हटवली जात आहे, पण बंगालमध्ये तसे होत नाही. बंगालमध्ये भ्रष्टाचार शिगेला पोहोचला आहे. २०२६ च्या निवडणुकीत बंगालमध्ये भाजपचे सरकार दोन तृतीयांश बहुमताने स्थापन होईल. तत्पूर्वी, २०२४ च्या निवडणुकीत इतक्या जागा भाजपाला जिंकून द्या की, मोदींना शपथ घेतल्यानंतर म्हणावे लागेल की, मी बंगालमुळे पंतप्रधान झालो आहे.