जळगाव मिरर | संदीप महाले
जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपमधील अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना नगरसेवक पदाची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न झाले होते. मात्र, पक्षात दिग्गज नेत्यांच्या प्रवेशामुळे अनेक जुन्या कार्यकर्त्यांची उमेदवारी कापली गेली, तर काही प्रभावी नेत्यांच्या खास माणसांना उमेदवारी देऊन ते निवडूनही आले. निवडणुकीनंतर जळगाव महापालिकेत महायुतीची पुन्हा सत्ता स्थापन झाली आहे.
दरम्यान, आता महापौर पदासाठी मोठी रस्सीखेच सुरू झाली आहे. यंदा ओबीसी महिला आरक्षण निघाल्याने भाजपच्या दोन निष्ठावंत महिला नगरसेवकांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र, एका मोठ्या नेत्यांचा खास मानला जाणाऱ्या मित्राच्या घरातच महापौर पद जाणार असल्याची चर्चा सध्या जळगाव महापालिका वर्तुळात जोर धरू लागली आहे.
जर महापौर पदाची निवड अशाच पद्धतीने झाली, तर जळगाव महापालिकेचा कारभार जिल्ह्यातील एका तालुक्यातून चालवला जाणार असल्याचीही चर्चा रंगू लागली आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, भाजपमधील निष्ठावंत महिला नगरसेवकांमध्ये नाराजी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महापौर पदाच्या निर्णयाकडे आता शहरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, पक्षश्रेष्ठी कोणता निर्णय घेतात, यावरच भाजपमधील अंतर्गत समीकरणे आणि पुढील राजकीय चित्र ठरणार असल्याचे बोलले जात आहे.




















