जळगाव मिरर | संदीप महाले
भुसावळ नगरपालिका निवडणुकीचा निकाल हा केवळ स्थानिक सत्ताबदल नसून, राज्याच्या राजकारणात अनेक अर्थांनी महत्त्वाचा संदेश देणारा ठरतो. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांचा झालेला दारुण पराभव हा एका उमेदवारापुरता मर्यादित न राहता, सत्ताधारी भाजपविरोधात साचलेल्या नाराजीचा स्पष्ट कौल मानला जात आहे. सत्तेत असताना स्थानिक प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले, अशी भावना मतदारांमध्ये रुजत गेली होती आणि त्याचा स्फोट या निवडणुकीत दिसून आला.
विशेषतः गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या अमृत योजनेमुळे भुसावळकरांमध्ये तीव्र असंतोष होता. पाणीपुरवठा, पायाभूत सुविधा आणि विकासकामांबाबत मोठ्या घोषणा झाल्या, मात्र प्रत्यक्षात अपेक्षित कामे वेळेत पूर्ण न झाल्याने नागरिक वैतागले होते. मंत्रीपद मिळाल्यानंतर संजय सावकारे यांचा जनतेशी थेट संवाद कमी झाला, ‘मंत्रीपदाची हवा डोक्यात गेली’ अशी टीका शहरात उघडपणे होत होती. हाच राग मतपेटीतून व्यक्त झाला आणि त्याचा फटका थेट भाजपाला बसला.
या निवडणुकीत माजी आमदार संतोष चौधरी आणि अनिल चौधरी यांनी अत्यंत रणनीतीपूर्वक लढत दिली. त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवत संपूर्ण ताकद पणाला लावली. प्रचारापासून संघटन, मतदारांशी थेट संवाद आणि स्थानिक मुद्द्यांवर केंद्रित राजकारण यामुळे चौधरी बंधू पुन्हा एकदा भुसावळच्या राजकारणात केंद्रस्थानी आले. अनेक वर्षांनंतर त्यांचे वर्चस्व पुन्हा अधोरेखित झाले असून, स्थानिक नेतृत्व अजूनही किती प्रभावी ठरू शकते हे या निकालाने दाखवून दिले.
या विजयामागे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा प्रभावही निर्णायक ठरला. भुसावळ आणि परिसरातील त्यांचा मतगट्ठा आजही तितकाच मजबूत आहे, हे या निवडणुकीत स्पष्ट झाले. खडसे समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या गायत्री भंगाळे यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. वेगवेगळ्या राजकीय टप्प्यांवर असलेली समीकरणे एकत्र आली आणि त्याचा थेट फटका भाजपाला बसला.
एकूणच, भुसावळ नगरपालिका निवडणूक भाजपसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. सत्तेत असतानाही स्थानिक पातळीवर जनतेशी तुटलेला संवाद, रखडलेला विकास आणि प्रभावी स्थानिक नेतृत्वाचा अभाव यामुळे भाजपची रणनीती अपयशी ठरली. रजनी सावकारे यांचा पराभव हा संपूर्ण सत्ताधारी व्यवस्थेवरील नाराजीचा कौल असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. चौधरी बंधूंचे पुनरागमन, एकनाथ खडसे यांचा टिकून असलेला करिष्मा आणि जनतेचा रोष या त्रिसूत्रीने भाजपाला सुरुंग लावला असून, संजय सावकारे यांच्यासाठी हा निकाल आत्मपरीक्षणाचा आणि जमिनीवर उतरून नव्याने जनतेशी संवाद साधण्याचा स्पष्ट इशारा ठरतो.




















