जळगाव मिरर | १४ जुलै २०२५
जळगाव शहरातील आर. आर. विद्यालयातील इयत्ता नववीमध्ये शिकरणाऱ्या कल्पेश वाल्मिक इंगळे (वय १५, रा. रचना कॉलनी) या विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला असून त्याला ताब्यात घेतले आहे. नातेवाईकांनी केलेल्या आरोपानुसार या प्रकरणाची चौकशीसाठी सोमवारी कल्पेशच्या वर्गशिक्षकासह मुख्याध्यापक यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले असून त्यांची चौकशी केली जाणार आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील आर. आर. महाविद्यालयात मधल्या सुट्टीत जेवण केल्यानंतर त्याचे वर्गमित्रासोबत वाद झाले. या वादात वर्गमित्राने मारहाण केल्यामुळे तो खाली फरशीवर पडून त्याचा मृत्यू झाला असल्याचे कल्पेशच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. तसेच या घटनेविषयी सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक, वर्गशिक्षक व संस्थाअध्यक्षांना माहिती विचारली. त्यावेळी त्यांनी योग्य मार्गदर्शन न करता दिशाभूल केली. त्यामुळे घटनेबाबत शाळा प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती.
गुन्हा दाखल करण्यापुर्वी कल्पेशच्या वर्गमित्रांसह तेथे उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची पोलिसांनी विचारपूस केली. त्यांनी घडलेली घटना पोलिसांना सांगितल्यानंतर त्यांचे जबाब नोंदविण्यात आले होते, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटना घडल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी कल्पेशला उचलून ते वर्गशिक्षकांकडे घेवून गेले होते. त्यानंतर शिक्षकांनी कल्पेशला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केल्याचे विद्यार्थ्यांनी पोलिसांना सांगितले होते. त्यानुसार शाळेचे मुख्याध्यापक, वर्गशिक्षकांसह इतर शिक्षकांना चौकशीसाठी सोमवारी पोलीस ठाण्यात बोलविण्यात आले असून त्यांची चौकशी केली जाणार आहे.
