जळगाव मिरर | २७ जानेवारी २०२६
आज जवळपास प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असलेल्या व्हॉट्सॲपबाबत महत्त्वाची चर्चा सुरू झाली असून, भविष्यात हे अॅप वापरण्यासाठी युजर्सना पैसे मोजावे लागू शकतात. मेटा कंपनी व्हॉट्सॲपसाठी सबस्क्रिप्शन मॉडेल आणण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. म्हणजेच, जाहिराती न पाहता व्हॉट्सॲप वापरायचा असेल, तर युजर्सना सबस्क्रिप्शन घ्यावे लागू शकते.
गेल्या वर्षी मेटा कंपनीने व्हॉट्सॲपच्या स्टेटस आणि चॅनेल्समध्ये जाहिराती दाखवण्यासाठी चाचण्या केल्या होत्या. मात्र, युजर्सकडून मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त झाली होती. तरीही कंपनीने या निर्णयातून माघार न घेता, आता जाहिराती टाळण्यासाठी ‘Ad-Free सबस्क्रिप्शन’चा पर्याय आणण्याची दिशा पकडल्याचे दिसून येत आहे.
अलीकडेच व्हॉट्सॲपच्या 2.26.3.9 या व्हर्जनच्या कोडमध्ये काही नवीन स्ट्रिंग्स आढळून आल्या आहेत. यामधून स्टेटस आणि चॅनेल्समध्ये दिसणाऱ्या जाहिराती बंद करण्यासाठी जाहिरातमुक्त (Ad-Free) सबस्क्रिप्शन सुरू केले जाऊ शकते, असे संकेत मिळत आहेत. जरी कंपनीकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली, तरीही उपलब्ध माहितीनुसार व्हॉट्सॲप या दिशेने काम करत असल्याचे स्पष्ट होत आहे.
जर युजर्सनी हे सबस्क्रिप्शन घेतले नाही, तर त्यांना स्टेटस आणि चॅनेल्समध्ये वारंवार जाहिराती पाहाव्या लागू शकतात. मात्र, जे युजर्स पैसे देऊन सबस्क्रिप्शन घेतील, त्यांना जाहिरातमुक्त व्हॉट्सॲप वापरण्याची सुविधा मिळू शकते. सध्या हे सबस्क्रिप्शन फक्त स्टेटस आणि चॅनेल्सपुरते मर्यादित असण्याची शक्यता असून, चॅट्स किंवा कॉलिंगसारख्या मुख्य सेवांमध्ये जाहिराती येण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, सबस्क्रिप्शनची किंमत किती असेल, जाहिराती बंद करण्याव्यतिरिक्त आणखी कोणते अतिरिक्त फीचर्स मिळतील, तसेच हे मॉडेल नेमके कधी लागू होईल, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, एवढे नक्की की व्हॉट्सॲप हळूहळू जाहिरात आणि सबस्क्रिप्शन आधारित मॉडेलकडे वाटचाल करत असून, भविष्यात मोफत व्हॉट्सॲप वापरण्याची सवय बदलण्याची शक्यता आहे.




















