जळगाव मिरर | ७ मे २०२४
मध्य रेल्वेने आईआरसीटीसी सहकार्याने प्रवाशांना विशेषतः अनारक्षित डब्यांसमोर (जनरल क्लास कोच) स्वस्त दरात अन्न आणि नाश्ता उपलब्ध करून देण्यासाठी उपक्रम राबवला आहे. यात भुसावळ विभागातील मनमाड, खंडवा, बडनेरा व शेगाव या चार रेल्वे स्थानकांवर प्रायोगिकदृष्ट्या २० रूपयांत नाश्ता तर ५० रूपयांत जेवणाची सुविधा दिली जात आहे. मध्य रेल्वेतील पाच विभागातील १५ स्थानकांवर ही सुविधा मिळेल.
उन्हाळ्यात आणि सण उत्सवांच्या कालावधीत रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी होते. बऱ्याचदा लांबचा प्रवास असल्यास जनरल डब्यातील प्रवाशांची गैरसोय होते. त्यांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनातर्फे परवडणाऱ्या दरात जेवण उपलब्ध करून दिले जात आहे. विशेष म्हणजे हे स्टॉल जनरल डब्यांसमोरच उभे केले जात आहेत. यामुळे प्रवाशांना डब्यातून खाली उतरून खाद्यपदार्थ खरेदी करणे शक्य होते. या स्टॉल्सवर २० रूपयांत नाश्ता तर ५० रूपयांत जेवण उपलब्ध असते. मध्य रेल्वेतील मुंबई, भुसावळ, नागपूर, पुणे व सोलापूर विभागात हा प्रयोग राबवला जातोय. त्यासाठी मुंबई विभागातील इगतपुरी, कर्जत, भुसावळ विभागात मनमाड, खंडवा, बडनेरा, शेगाव, पुणे विभागात पुणे, मिरज, दौंड, साईनगर शिर्डी, नागपूर विभागात नागपूर, वर्धा व सोलापूर विभागात सोलापूर, वाडी आणि कुर्दुवाडी या स्थानकांवर ही सेवा सुरू करण्यात आली आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर पुढील टप्यात इतरही महत्त्वाच्या स्थानकांवर ही सुविधा सुरू करण्याचा निर्णय होऊ शकतो, अशी माहिती रेल्वेतील स्थानिक सूत्रांनी दिली.