
जळगाव मिरर | १४ मे २०२५
प्रेम प्रकरणाच्या माध्यमातून हाणामारी व खुनाच्या घटना सातत्याने घडत असतांना एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात एका प्रियकराने कोयत्याने वार करत प्रेयसीची निर्घृण हत्या केली आहे. त्यानंतर स्वतःला गळफास घेत आत्महत्या केली. प्राथमिक माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी हा प्रकार घडला असून शेखर दुधाणे आणि पौर्णिमा अशी मृताची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, परळीतील राजेंद्र पॉलीक्लिनिक नर्सिंग होम रुग्णालयात पौर्णिमा ही नर्स म्हणून काम करत होती. तिचे शेखर दुधाणे यांच्यासोबत प्रेमसंबंध होते. दोघांमध्ये झालेल्या किरकोळ वादानंतर शेखरने ती काम करत असलेल्या रुग्णालयात जात तिच्यावर कोयत्याने वार केले. यामध्ये तरुणीचा जागीच मृत्यू झाला. यानंतर त्यानेही तिथेच गळफास घेत आत्महत्या केली.
पौर्णिमा अनंत देसाई आणि शेखर संतोष दुधाणे या दोघांमध्ये गेली काही वर्ष प्रेमसंबंध होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यामध्ये वाद सुरू होते. यातच मंगळवारी त्यांच्यात वाद झाल्यानंतर पोर्णिमा ती काम करत असलेल्या राजेंद्र पॉलीक्लिनिक नर्सिंग होममध्ये गेली. थोड्याच वेळात शेखर हातात कोयता घेऊन आला. त्याने पोर्णिमाच्या गळ्यासह अंगावर अनेक ठिकाणी वार केले. यात तिचा जागीच मृत्यू झाला. यानंतर त्याने स्वत: गळफास घेतला. हल्ल्यानंतर पौर्णिमा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.
या घटनेची माहिती मिळताच जांभूळपाडा, पाली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जात पंचनामा केला. पाली पोलिस निरीक्षक सरिता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. यावेळी दवाखान्याबाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. नेमके हत्या का केली याबद्दल माहिती समजू शकली नसली तरी दोघांमधील वादातूनच ही हत्या झाली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. शेखर आणि पौर्णिमा यांच्या नातेसंबंधांचा तपशील तपासला जात आहे.





















