
जळगाव मिरर | २८ एप्रिल २०२६
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) जळगाव येथे कारवाई करत आरोग्य विभागातील सहाय्यक अधीक्षकास लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई २८ एप्रिल २०२६ रोजी करण्यात आली असून, या प्रकरणामुळे जिल्ह्यातील शासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका तक्रारदाराकडून नोकरीसंदर्भातील स्थायी आदेश मिळवून देण्यासाठी पारोळा कुटीर रुग्णालय येथील सहाय्यक अधीक्षक संशयित आरोपी विजय प्रकाश वाघ (वय ४२)यांनी ३,००० रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे आरोपीने २,००० रुपयांची लाच स्वीकारताच अधिकाऱ्यांनी त्याला रंगेहाथ पकडले. ही कारवाई पारोळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली असून, भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तपासादरम्यान आरोपीकडून रोख २३० रुपये आणि एक व्हिवो कंपनीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.
यांनी केली कारवाई
पोलिस उप अधिक्षक श्री. योगेश ठाकूर, पोलिस निरीक्षक श्री. हेमंत नागरे, सुरेश पाटील, पाहेका सुनिल वानखेडे, पोहेकाँ .बाळु मराठे यांनी हि कारवाई यशस्वी केली






















