
जळगाव मिरर | २८ जुलै २०२४
चोपडा तालुक्यातील अडावद येथून जवळच असलेल्या विष्णापूर येथील एका व्यक्तीकडून आज सायंकाळी पोलिसांनी सुमारे १० लाखाचा ओला गांजा हस्तगत केला. पोलिसांनी आरोपीस अटक केली असून त्याच्या ताब्यातून ११ लाख ५०० रुपयांच्या मुद्देमाल हस्तगत केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अडावद पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, विष्णापुर येथील सायसिंग बरकत बारेला याने आपल्या पत्री शेडमध्ये गांजा विक्रीसाठी ठेवला आहे. ही माहिती समजात सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात, पोहेकॉ भरत नाईक, पोहेकॉ सतीश भोई आदींच्या पथकाने संबंधित ठिकाणी धाव घेतली. या वेळी संशयित आरोपी बारेला हा आपल्या पत्री शेडमध्ये गांजासह आढळून आला.
या वेळी त्याच्याकडून ९ लाख ९४ हजार ५०० रुपयांचा ६६ किलो ३०० ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत केला. या गांजाची १५ हजार रुपये प्रति किलो किंमत आहे. त्यासोबत ६ हजाराचा एक वजन काटा आणि एक लाखाची बजाज कंपनीची दुचाकी असा एकूण ११ लाख ५०० रुपयांच्या मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात पो.हे.कॉ. भरत नाईक यांच्या फिर्यादीवरून विष्णपूर येथील शिवाजी पाडा येथील सायसिंग बरकत बरेला (वय ३६) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण यांनी भेट देऊन पाहणी केली.




















