
जळगाव मिरर | २४ मार्च २०२६
जळगाव जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विशेष ‘ऑपरेशन ऑल आऊट’ अंतर्गत नशिराबाद पोलिसांनी दरोडा प्रकरणातील फरार आरोपीस अटक केली आहे.
पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या कोंबिंग ऑपरेशनदरम्यान सहायक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांनी आपल्या पथकासह कारवाई करत ही अटक केली. गुप्त माहितीनुसार कट्टा घेऊन परिसरात दहशत माजवत फिरणाऱ्या चेतन सूर्यभान पाटील (रा. वरची आळी, नशिराबाद) याच्यावर अचानक छापा टाकण्यात आला. या कारवाईत आरोपीच्या ताब्यातून एक लोखंडी चंदेरी रंगाचा, काळ्या प्लास्टिकच्या मुठीसह गावठी कट्टा तसेच एक डमी कट्टा जप्त करण्यात आला आहे. चेतन पाटील हा दरोड्याच्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी असून अलीकडील गोळीबाराच्या घटनेतही त्याचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 93/2026 अन्वये शस्त्र अधिनियम कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ प्रशांत विरणारे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. योगिता नारखेडे यांच्या पथकातील राजेश मेंढे, कमलाकर बागुल, भरत बाविस्कर, पंकज सोनवणे, भुषण पाटील आणि विजय अहिरे यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. या कारवाईमुळे परिसरात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.





















