जळगाव मिरर | १९ नोव्हेंबर २०२५
चोपडा तालुक्यातील धानोरा येथे होमगार्डच्या घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर एएचटीयू या विशेष शाखेच्या पथकाने छापा टाकला. याठिकाणाहून पीडित महिलेची सुटका करण्यात आली. ही कारवाई सोमवारी सायंकाळच्या सुमारास झाली. याप्रकरणी दाम्पत्याविरुद्ध अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, चोपडा तालुक्यातील धानोरा येथे राहणाऱ्या चंद्रकांत सुपडू सोनवणे यांच्या घरात कुंटणखाना सुरु असल्याची माहिती एएचटीयू विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांकडून या कुंटणखान्यावर कारवाईसाठी पथक तयार करण्यात आले होते. पथकाने डमी ग्राहक पाठवून खात्री करण्यासाठी पाठविले. त्या ग्राहकाने इशारा देताच सापळा रचून बसलेल्या पथकाने कुंटणखाना सुरु असलेल्या घरावर छापा टाकला. या कारवाईमध्ये पीडित महिलेची सुटका करण्यात आली.
ज्या घरात कंटणखाना सरु होता ते घर चंद्रकांत सोनवणे यांचे असून ते होमगार्ड आहेत. त्यांनी पीडित महिलेला त्याच्या घरी आणून तिच्याकडून जबरदस्तीने तिच्या इच्छेविरुद्ध वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करुन तिच्या कमाईवर उपजीविका करीत असल्याचे उघड झाले आहे. संशयित होमगार्ड चंद्रकांत सुपडू सोनवणे (वय ४५) व शिला चंद्रकात सोनवणे (वय ४२, दोघ रा.धानोरा ता. चोपडा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सपोनि प्रमोद वाघ करीत आहेत. घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर कारवाई केल्यामुळे पोलिसांच्या या कारवाईचे ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. तसेच या कुंटणखान्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी केली. या कारवाईवेळी ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.




















