जळगाव मिरर | २१ मार्च २०२४
राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना एक संतापजनक घटना लातूर शहरातून समोर आली आहे. एका बापाने आपल्या पोटच्या एकुलत्या एक सहा वर्षांच्या चिमुकलीला राहत्या घरीच गळफास देऊन निर्दयी पित्याने स्वतःही गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना लातूरच्या मोतीनगर भागात बुधवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घडली. आर्थिक विवंचनेतून निर्दयी पित्याने हे कृत्य केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेने लातूरकरांतून हळहळ व्यक्त होत असून सायंकाळी साडेसहा वाजता दोघांच्याही पार्थिवांवर मारवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, लातूरच्या मोतीनगर भागात अभय लक्ष्मीनिवास भुतडा (३६) यांचे ‘राम-काशी’ हे निवासस्थान आहे. भुतडा यांचे मोतीनगर भागातील कोरे गार्डनसमोरील रस्त्यावर इडली सेंटर होते. भुतडा यांच्यावर कर्जाचा डोंगर झाला होता. यामुळे त्यांची आर्थिक चणचण सुरू होती. यातून नैराश्य आल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. या नैराश्यातूनच अभय भुतडा हे बुधवारी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास ईडलीच्या दुकानातून घरी जाऊन येतो, असे कामगारांना सांगून घराकडे गेले होते. घरी गेल्यानंतर भुतडा यांनी स्वतःच्या सहा वर्षांच्या नौव्या अभय भुतडा या चिमुकलीला घरातच दोरीच्या सहाय्याने फासावर लटकवले. त्या वेळी तिचा जीव गेल्याचे लक्षात आल्यानंतर अभय भुतडा यांनीही स्वतःला गळफास लावून घेत आत्महत्या केली.
त्या वेळी त्याची पत्नी ही जवळच असलेल्या तिच्या वडिलांकडे गेल्याचे पोलिसांनी सांगितले. साडेनऊ वाजेच्या सुमारास घडलेली ही घटना पोलिसांना सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास समजली. तत्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.