जळगाव मिरर | ७ नोव्हेंबर २०२५
पाचोरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केवळ चार तासांतच चोरीचा गुन्हा उघडकीस आणत चोरट्यास जेरबंद केले. तसेच चोरीस गेलेली सुमारे ४५ हजार रुपयांची दुचाकीही हस्तगत करण्यात आली आहे. पोलिसांच्या या जलद कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील भोजे चिंचपुरे येथील मेडिकल व्यावसायिक मनोज डिगंबर जाधव (वय ३०) यांनी दि. ४ नोव्हेंबर रोजी दुपारी जारगाव चौफुली येथे आपली काळ्या रंगाची बजाज प्लॅटीना दुचाकी (क्र. एमएच-१९ सीपी-०८६९) उभी केली होती. फळ घेण्यासाठी गेलेल्या दरम्यान अज्ञात चोरट्याने दुचाकी लंपास केली. याप्रकरणी मनोज जाधव यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोहेकॉ राहुल शिंपी, पोकॉ योगेश पाटील, पोकॉ शरद पाटील, पोकॉ गणेश कुवर आणि पोकॉ श्रीराम शिंपी यांनी हाती घेतला. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास सुरू असताना संशयित कृष्णापुरी परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून तालुक्यातील पिंप्री खुर्द येथील भगवान लक्ष्मण पाटील (वय ३५) यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
तपासादरम्यान आरोपीकडून चोरीस गेलेली दुचाकी जप्त करण्यात आली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, चाळीसगाव परिमंडळाच्या अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास पोहेकॉ राहुल काशिनाथ शिंपी करीत आहेत.



















