
जळगाव मिरर | ११ एप्रिल २०२६
धरणगाव शहरात संशयाच्या कारणावरून एका पतीने आपल्या पत्नीवर भररस्त्यात जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली. बालकवी ठोंबरे स्मारकाजवळील नाल्यानजीक ही घटना घडली असून, या प्रकरणी पतीविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपक बुधा लोंढे (वय ४०, रा. संजय नगर, धरणगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याची पत्नी सोनल लोंढे (वय ३३) ही धुणीभांडी करून उदरनिर्वाह करते. बुधवारी दुपारी काम आटोपून ती घरी परतत असताना, बालकवी ठोंबरे स्मारकाजवळ दीपकने तिला अडवले.
अचानकपणे त्याने सोनलच्या डोळ्यांत मिरचीपूड फेकली. त्यामुळे ती गोंधळलेल्या अवस्थेत असतानाच, दीपकने चाकूने तिच्यावर सपासप हल्ला केला. हात, पाय, पोट आणि पाठीवर तब्बल १३ वार करण्यात आले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेली सोनल अतिरक्तस्रावामुळे घटनास्थळीच कोसळली. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी तत्काळ तिला धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी तिला जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून, सध्या ती मृत्यूशी झुंज देत आहे.
दरम्यान, सोनल लोंढे हिच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिस ठाण्यात दीपक लोंढे याच्याविरुद्ध शुक्रवारी सायंकाळी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.





















