जळगाव मिरर | २६ फेब्रुवारी २०२६
सोशल मीडियाच्या युगात फ्रॉडचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत, आणि हे फक्त सामान्य लोकांपुरते मर्यादित नाहीत; अगदी कलाकारांनाही हे लक्ष्य बनवले जात आहे. असाच एक धक्कादायक प्रकार मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकर सोबत घडला आहे.
अलीकडेच चिन्मय मांडलेकरला एका सायबर फसवणुकीचा फ्रॉड फोन आला, ज्यात त्याला वीज/गॅस बिल न भरल्यास 30 मिनिटांत लोक घरात येतील अशी धमकी देण्यात आली होती. अभिनेता यांनी हा अनुभव सोशल मीडियावर शेअर करून, चाहत्यांना अशा प्रकारच्या फोन कॉलपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
चिन्मयने आपल्या पोस्टमध्ये कॉलची व्हॉइस रेकॉर्डिंग आणि व्हॉट्सअॅपवर आलेल्या मेसेजचा स्क्रिनशॉट शेअर केला. त्यात फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने त्याच्या पत्नीला सांगितले की, “जानेवारी महिन्याचं 1068 रुपये बिल भरलेलं नाही, तुमचं बिल अपडेट दिसत नाही. व्हॉट्सअॅपला पाठवलेली फाइल डाऊनलोड करा. जर वेळेत पैसे भरले नाही, तर पुढच्या 30 मिनिटांत आमची माणसं येऊन तुमचं कनेक्शन कट करतील.”
पण, चिन्मयच्या पत्नीला लगेचच लक्षात आलं की हा स्कॅम असू शकतो. तिने कॉल करणाऱ्यांना सांगितले की, “तुम्ही म्हणताय तसा मला कोणताच मेसेज आलेला नाही. तसेच कनेक्शन कट करायला जे येणार आहेत, त्यांनी पहिल्यांदा माझ्याशी संपर्क साधला पाहिजे.” यावर स्कॅमर गोंधळला आणि त्यांनी हा फ्रॉड असल्याचे मान्य केले.
चिन्मयने चाहत्यांना हे स्पष्ट केले की, अशा प्रकारच्या फोन कॉल, व्हॉट्सअॅप मेसेज किंवा ई-मेल्सवर विश्वास ठेवू नका. कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका आणि कधीही पैसे न पाठवता आधी खात्री करा. त्यांच्या पोस्टमुळे अनेक चाहत्यांना या प्रकारच्या सायबर फ्रॉडपासून सावध राहण्यास मदत होणार आहे. सामान्य नागरिकांसाठी हा प्रकार एक महत्त्वाची जागरूकता ठरतो, कारण आजकाल सायबर फसवणूक कोणावरही होऊ शकते.




















