जळगाव मिरर | २० जुलै २०२५
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अलीकडील वक्तव्यांमुळे हिंदी भाषिक समाजात अस्वस्थता निर्माण झाल्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत त्यांच्यावर द्वेषमूलक भाषण, तणाव निर्माण करणारे विधान आणि हिंसाचाराला चिथावणी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याचिकादार वकील घनश्याम उपाध्याय यांनी कोर्टाकडे राज ठाकरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. मुंबई व उपनगरांमध्ये अलीकडच्या काळात मनसे कार्यकर्त्यांनी काही व्यापाऱ्यांशी मराठी भाषा न वापरल्याच्या कारणावरून वाद घातल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
याचिकेत पुढील मुद्दे मांडण्यात आले आहेत:
- राज ठाकरे यांनी भाषणातून हिंदी भाषिक समाजाविरुद्ध वैरभाव आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण केले.
- इतर राज्यांमधून आलेल्या नागरिकांवर मराठी भाषा लादली जात असल्याचा आरोप.
- सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या वक्तव्यांमुळे राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार (NSA) कारवाई व्हावी.
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाचे काही ज्येष्ठ वकील आणि मुंबईतील तिघा वकिलांनी राज्याचे पोलिस महासंचालक (DGP) यांच्याकडेही तक्रार नोंदवली असून, या वक्तव्यांमुळे राज्यात शांतता भंग होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे.
विरोधकांची प्रतिक्रिया
भाजप खासदार आणि गायक मनोज तिवारी यांनी राज ठाकरे यांच्या विधानावर तीव्र शब्दात टीका केली. “राज ठाकरे यांच्यासोबत जे जातील त्यांचा महाराष्ट्रात राजकीय अस्त होईल,” असे ते म्हणाले. तर राज्यसभेचे खासदार संजय दुबे यांनी दावा केला की, “राज ठाकरेंनी हिंदी बोलणाऱ्यांविरोधात गरळ ओकली असून, त्यांनी मुंबईसारख्या महानगरात द्वेषाचे वातावरण निर्माण केले.”
