जळगाव मिरर | २४ जानेवारी २०२६
शहरातील कचरा संकलनाचे काम करणाऱ्या मक्तेदाराचा गैरप्रकार उघडकीस आला असून, निमखेडी शिवारातील कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्प परिसरात शुक्रवारी थेट माती व बांधकामाचे अवशेष आणल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, हा राडारोडा एका ट्रॅक्टरमधून कचऱ्याच्या नावाखाली डेपोवर टाकण्यात आला, ज्यामुळे महापालिकेला आर्थिक गंडा घालण्याचा प्रयत्न झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापालिकेच्या नियमानुसार कचरा डेपोवर फक्त घरांमधून गोळा केलेला ओला व सुका कचरा आणणे बंधनकारक आहे. मात्र, प्रत्यक्षात आणण्यात आलेल्या मालामध्ये कचऱ्यापेक्षा मातीचे वजन अधिक असल्याचे आढळून आले. वजन वाढवून अधिक बिल उचलण्यासाठीच हा प्रकार करण्यात आल्याचा संशय बळावला आहे.
हा प्रकार लक्षात येताच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. प्राथमिक तपासात माती व बांधकाम अवशेष मुद्दाम आणल्याचे स्पष्ट झाले असून, संबंधित मक्तेदाराविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
शहरातील कचरा व्यवस्थापनात पारदर्शकता आणि नियमांचे पालन अपेक्षित असताना, अशा प्रकारामुळे महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. या प्रकरणात दंडात्मक कारवाईसह करार रद्द करण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता या गैरप्रकारावर महापालिका काय कठोर भूमिका घेते? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.




















