जळगाव मिरर | १२ जानेवारी २०२५
चाळीसगाव शहरासह तालुक्यात अवैधरित्या गॅस रिलिफिंगचा प्रकार गेल्या अनेक वर्षापासून सर्रास सुरू असून या घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार ही होत असल्याची चर्चा होत आहे.
जिल्ह्यात अवैध गॅस रिलिफिंगप्रकरणी काही कारवाई पोलिसांकडून अलीकडे करण्यात आल्या आहेत. त्याच पद्धतीने चाळीसगाव शहरासह तालुक्यात अशा कारवाई का होत नाहीत ? असा प्रश्न निर्माण होत आहे. तर गॅस रिलिफिंगसाठी गॅस सिलिंडर मिळते कोठे, अशी चर्चा ही यानिमित्त केली जात आहे. पैसे कमावण्यासाठी सर्वसामान्यांच्या जीवाशी हा खेळ खेळला जात असल्याचे ही बोलले जात आहे. जिल्ह्यात घरगुती गॅस अवैधरित्या वाहनात भरताना वाहनाचा स्फोट झाल्याचा प्रकार अलीकडेच घडला होता. या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी अवैध गॅस रिलिफिंग प्रकार उघडकीस आणून कारवाई करण्यात आली होती. तर चाळीसगाव तालुक्यात ही मोठ्या प्रमाणावर अवैध गॅस सिलिंडर रिलिफिंग होत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. तर पेट्रोल, डिझेलचे वाढते दर आणि चारचाकी वाहनांना कमी असलेले अॅव्हरेज, यामुळे वाहनांमध्ये सर्रासपणे गॅसचा वापर केला जात असल्याचे बोलले जाते.
त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया व कागदपत्रांची पूर्तता करून वाहनांना गॅस जोडून देण्याची प्रक्रिया महागडी असल्याने अवघ्या काही हजारात कोणत्याही कागदपत्रांविना गॅस सिस्टीम जोडून मिळते. त्यामुळे अशा गॅसवर चालणाऱ्या वाहनांची संख्या वाढत असल्याचे दिसून येते. वाहनांमध्ये गॅसकिट जोडून बेकायदेशीरपणे वाहनात गॅस भरणाऱ्यांची संख्या ही अधिक आहे. कारण अधिकृत पंपावर गॅस भरण्यासाठी लांब जावे लागते. त्यामुळे हजार ते बाराशे रूपयात १४ किलो गॅस भरण्यासाठी सर्रास गॅस हंडीचाच पर्याय वापरला जातो. काही खासगी हॉटेलमध्येही घरगुती गॅस सिलिंडरचा वापर होत असून त्यांना व्यावसायिक गॅस वापरण्यास सक्ती केली पाहिजे, असा सूर जनमानसातून उमटत आहे.