जळगाव मिरर | २ डिसेंबर २०२४
अमळनेर येथे शेताच्या वादावरून पोलिसाला सख्खाभाऊ आणि पुतण्याने मारहाण केल्याची घटना ३० रोजी सकाळी ११ वाजता जानवे येथे घडली. मुंबई पोलिसात कार्यरत असलेले गुरुदास अर्जुन पाटील (वय ५२) रा.जानवे हे ३० रोजी त्यांच्या वडिलोपार्जित शेतीत रोटा मारण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन गेले असता त्यांचा भाऊ ट्रॅक्टर पुढे येऊन शिवीगाळ करू लागला. तू ट्रॅक्टर लावू नको नाहीतर तू नोकरी कशी करतो मी बघतो, अशी धमकी दिली.
तसेच त्याने हातातील लाकडी दांडक्याने उजव्या गालावर, कमरेवर, पोटावर, गुडघ्यावर, मांडीवर मारहाण केल्याने पोलिसाच्या तोंडातून रक्त येऊ लागले. तर पुतण्या कल्पेश चंद्रकांत पाटील याने देखील घट्ट पकडून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी आजूबाजूच्या लोकांनी भांडण आवरले. तेव्हा चंद्रकांत पाटील याने जाता जाता तू पुन्हा शेतात पाय ठेवला तर तुझा मर्डर करून टाकू पाय तोडून टाकू म्हणत धमकी दिली. दवाखान्यातून उपचार घेऊन आल्यावर गुरुदास याने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून चंद्रकांत पाटील व कल्पेश यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता ११८(१), ११५, ३५२, ३५१ (२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे करत आहेत.