जळगाव मिरर । १० डिसेंबर २०२५
रावेर पोलिस ठाण्याच्या गु.र.नं. ४९५/२०२५ मधील तक्रार चौकशी नोंदवू नये म्हणून २० हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी निंभोरा पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत पोलिस हवालदार सुरेश पवार यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. तक्रारदारांनी ७ ऑक्टोबर २०२५ रोजी दिलेल्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की , तक्रारदार हे शेतकऱ्यांकडून १ लाख २७ हजार रुपयांचा केळीचा माल घेऊन दिल्लीतील व्यापाऱ्यांना विक्री करणारे होते. परंतु त्याबदलात शेतकऱ्यांना पैसे न दिल्याने संबंधित शेतकऱ्यांनी तक्रारदाराविरोधात लेखी तक्रार केली. ही चौकशी निंभोरा पोलिस स्टेशनला देण्यात आली होती. चौकशीदरम्यान पोलिस हवालदार सुरेश पवार यांनी तक्रारदाराकडील प्रकरण गुन्ह्यात रूपांतरित होऊ नये यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. तक्रारदाराकडे देयक रकमेच्या दहा टक्के ‘सेटिंग’ म्हणून पवार यांनी प्रथम लाचेची मागणी केली होती. तक्रारदारांनी ही बाब लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ७ ऑक्टोबर रोजी कळवली. त्यानुसार पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली असता, पवार यांनी निंभोरा पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांच्यासाठी २०,००० रुपये देण्याची मागणी केल्याचे स्पष्ट झाले.
या निकषांवरून हवालदार सुरेश पवार यांच्या विरोधात लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पथकाचे नेतृत्व पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांनी केले. सापळा पथक स. फौज. दिनेशसिंग पाटील, पोहेकॉ/ किशोर महाजन, मपोहेकॉ / संगीता पवार, पोकॉ/ राकेश दुसाने, पोकों/अमोल सुर्यवंशी, पोकों/भुषण पाटील सर्व नेम.ला.प्र.वि.जळगाव तर पुढील तपास पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकुर हे करीत आहेत.




















