जळगाव मिरर | १८ सप्टेंबर २०२५
राज्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्या अडचणी पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात वाढण्याची शक्यता आहे. पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणी शेकडो महिलांना फसवून त्यांचे अश्लील व्हिडीओ शूट करण्यात आल्याचा आल्याचा आरोप आहे. या गंभीर प्रकरणाच्या सखोल तपासासाठी राज्य महिला आयोगाने विशेष तपास पथक (एसआयटी) गठीत करण्याचे निर्देश दिले आहेत.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महिती दिली आहे की, खेवलकरांच्या रेव्ह पार्टी प्रकरणात 250–300 पेक्षा अधिक महिलांना आमिष दाखवून फसवण्यात आले. या पार्टीदरम्यान मोबाईल आणि लॅपटॉपमधून अत्यंत अश्लील व्हिडीओ मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पीडित महिलांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. या सर्व तक्रारींच्या आधारे पुणे पोलिस आयुक्तांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रकरणाचा तपास केवळ वरवर न होता, सखोल व्हावा यासाठी एसआयटी गठीत करण्याची मागणी करण्यात आली आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या मते, या प्रकरणाचा संबंध मानवी तस्करीच्या रॅकेटशी असण्याची शक्यता आहे. रेव्ह पार्टीमध्ये विविध प्रलोभने दाखवून आणलेल्या महिलांचा गैरवापर झाला असावा अशी शंका त्यांनी व्यक्त केली. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आणि महिलांची फसवणूक व लैंगिक अत्याचार थांबावेत यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या.