जळगाव मिरर | १३ डिसेंबर २०२५
पोलीस असल्याचा बनाव करून धमकावत ८६ वर्षीय सेवानिवृत्ताची तब्बल ८० लाख पाच हजार ४१६ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गोरगरिबांची फसवणूक, मनी लॉन्ड्रिंग व अतिरेक्यांना पैसे दिल्याचे खोटे आरोप करत सायबर गुन्हेगारांनी ही रक्कम उकळली. या प्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महावितरणचे सेवानिवृत्त कर्मचारी सुकदेव पांडुरंग चौधरी (वय ८६, रा. भुसावळ) यांना २७ ऑक्टोबर रोजी अनोळखी मोबाईल क्रमांकावरून कॉल आला. कॉल करणाऱ्याने आपण ‘डेटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडिया’ येथून बोलत असल्याचे सांगून चौधरी यांच्या नावावर अनेक बनावट मोबाईल क्रमांक असल्याचा दावा केला. त्याद्वारे फसवणूक होत असून कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे सांगत भीती घातली.
२८ ऑक्टोबर रोजी पुन्हा कॉल करून पॉर्नोग्राफी व्हिडीओ पाहणे तसेच अतिरेक्यांकडून पैसे घेतल्याचे आरोप करत गुन्ह्यातून वाचण्यासाठी बँक खात्याची माहिती देण्यास सांगितले. धमक्यांमुळे घाबरून चौधरी यांनी ६ नोव्हेंबर रोजी ३८ लाख ९५ हजार २०८ रुपये, १० नोव्हेंबर रोजी २१ लाख १० हजार २०८ रुपये आणि ५ डिसेंबर रोजी २० लाख रुपये विविध खात्यांत ट्रान्सफर केले.
यानंतर ‘पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट’ देण्याचे आमिष दाखवून आधार कार्डचा फोटोही मागविण्यात आला. मात्र, तुमच्या नावावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा असून दोन कोटींचा व्यवहार अतिरेक्यांना ट्रान्सफर झाल्याचे सांगत सर्टिफिकेट देण्यास नकार देण्यात आला. रक्कम मिळताच आरोपींचे कॉल बंद झाले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चौधरी यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पुढील तपास सुरू असून नागरिकांनी अशा धमकीच्या कॉल्सना बळी न पडता तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




















