जळगाव मिरर | २६ नोव्हेंबर २०२५
राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या मालवाहू वाहनावर रामानंद नगर पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे ३० लाख २० हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. या प्रकरणात वाहन चालक किरण भास्कर नांदरे (४३, रा. सेंट्रल बँक कॉलनी, पिंप्राळा) याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहितीनुसार, पिंप्राळा परिसरातील सेंट्रल बँक कॉलनी येथील एकमुखी दत्त मंदिराजवळ एमएच १९ सीएक्स ६६३४ क्रमांकाचे मालवाहू वाहन संशयास्पदरीत्या उभे असल्याची माहिती रामानंद नगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, पोहेकॉ कालसिंग बारेला, प्रवीण जगदाळे व विनोद सुर्यवंशी यांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहनाची तपासणी केली असता त्यात राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा, पानमसाला व तंबाखूचे पोते व बॉक्स असा तब्बल २४ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी तत्काळ अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती दिली. त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार अमोल जगताप, आकाश बोऱ्हाडे व योगराज सुर्यवंशी यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले.
मुद्देमाल जप्त केल्यानंतर पोलिसांनी वाहन चालक किरण नांदरेला ताब्यात घेतले. प्रतिबंधित गुटख्याची चोरटी वाहतूक कोणत्या मार्गाने होत होती व पुरवठा कुठे केला जात होता, याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. पोलिसांनी पंचनामा करून वाहनासह सर्व जप्त केलेला मुद्देमाल रामानंद नगर पोलिस ठाण्यात जमा केला असून पुढील तपास सुरू आहे.





















