जळगाव मिरर | ५ जानेवारी २०२४
राज्यात गेल्या काही वर्षापासून विद्येची नगरी म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरात गुन्हेगारी वाढत असल्याने आता पुणे शहराचे गुन्हेगारी शहर म्हणून ओळख निर्माण होत असतांना नुकतेच शहरातील कोथरूडमधील सुतारदरा परिसरात कुख्यात गुंड शरद मोहोळवर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याला तीन गोळ्या लागल्या असून गंभीर जखमी झाला आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून भर दुपारी घडलेल्या या घटनेने पुण्यात एकच खळबळ माजली आहे.
शरद मोहोळ पुण्यातील कुख्यात गुन्हेगार असून त्याच्यावर खून, खूनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. दरम्यान त्याच्यावर हल्ला पूर्ववैमन्यस्यातून झाला की आणखी कोणत्या कारणातून याची अद्याप कोणतीच माहिती समोर आलेली नाही. कोथरूड परिसरातील सुतारदरा या ठिकाणी शरद मोहोळ जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी शरद मोहोळ यांच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी शरद मोहोळच्या खांद्याला लागली.
गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळ याच्यावर कोथरूड परिसरातीलच एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला आहे. गोळ्या झाल्यानंतर आरोपी पसार झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.