जळगाव मिरर | ७ ऑगस्ट २०२४
राज्यात दोन महिन्यावर आगामी विधानसभा निवडणूक येवून ठेपल्याने सर्वच पक्ष कामाला लागले असतांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील राज्याच्या दौऱ्यावर बाहेर पडले आहे. लोकसभेमध्ये महायुतीला बिनशर्त पाठिबा मनसेने दिला होता तर आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्वच जागेवर उमेदवार जाहीर करण्यात येणार असल्याच्या सूचना राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिल्यानंतर ठाकरे राज्याच्या दौऱ्यावर निघाले असतांना त्यांनी पहिल्या टप्प्यात तब्बल ३ उमेदवारांची नावे जाहीर करून कामाला लागण्याच्या सूचना देखील केल्या आहे.
सोलापूर दौऱ्यावर असताना सोलापूर आणि शिवडी येथील उमेदवारांच्या नावाची घोषणा देखील केली होती. उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात राज ठाकरे यांनी आघाडी घेतली आहे. त्याचप्रमाणे लातूर जिल्हा दौऱ्यात देखील त्यांनी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून संतोष नागरगोजे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. राज ठाकरे यांनी जाहीर केलेला हा तिसरा उमेदवार आहे. त्यामुळे आता राज ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
राज ठाकरे यांचा मराठवाडा दौरा हा महत्त्वाचा मानला जातोय. या दौऱ्यात विधानसभा निवडणुकीत उमेदवारांच्या नावाची घोषणाच थेट राज ठाकरे करत आहेत. त्यात लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून त्यांनी संतोष नागरगोजे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार धीरज देशमुख यांच्या विरोधात संतोष नागरगोजे हे निवडणुकीला सामोरे जातील हे जवळपास निश्चित मानले जात आहे.