जळगाव मिरर | ७ ऑगस्ट २०२५
अपार्टमेंटमध्ये उतरलेल्या विद्युत प्रवाहामुळे वाळत टाकलेले कपडे काढत असतांना विजेचा शॉक लागून भावना राकेश जाधव (वय ७१, रा. रोटरीभवन, महाबळ) यांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास महाबळ परिसरातील गजानन रेसीडेन्सी येथे घडली. यावेळी जिल्हा रुग्णालयात त्यांच्या कुटुंबियांसह नातेवाईकांनी गर्दी केली होती. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील महाबळ परिसरातील गजानन रेसिडेन्सी अपार्टमेंटमध्ये भावना जाधव या पती, मुलगा, सून व दोन नातूंसह वास्तव्यास होत्या. त्यांचे पती पाटबंधारे खात्यातून सेवानिवृत्त झाले असून मुलगा व्यावसायीक आहे. त्यांचे पती आणि मुलगा काही कामानिमित्त बाहेर गेलेले होते, त्या सुन व मुलीसह घरी होत्या. सकाळी त्यांनी घराच्या मागील बाजूस असलेल्या गॅलरीत तारेवर कपडे वाळत घातलेले होते. दुपारी कपडे वाळल्यानंतर ते काढण्यासाठी गेल्या. यावेळी तारेत विद्युत प्रवाह उतरल्यामुळे त्यांचा विजेचा जोरदार शॉक लागून त्या खाली कोसळल्या. शॉक लागून जमिनीवर कोसळल्याने रक्तस्त्राव काहीतरी पडल्याचा जोरात आवाज आल्याने भावना जाधव यांची मुलगी आणि सून तात्काळ गॅलरीकडे धाव घेतली. यावेळी त्यांना वृद्ध महिला या जमिनीवर पडलेल्या होत्या, तर त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत असल्याचे त्यांना दिसताच त्यांनी भावाला घटनेची माहिती दिली. शॉक लागून भावना जाधव यांचा मृत्यू झाल्याचे समजताच त्यांच्या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्यांनी तात्काळ त्यांच्या घराच्या दिशेने धाव घेतली. यावेळी त्यांनी मंगळवारी रात्रीपासूनच अपार्टमेंटमध्ये विद्युतप्रवाह उतरला असल्याचे सांगितले.
जखमी अवस्थेत भावना जाधव यांना तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करीत महिलेला मयत घोषीत केले. भावना जाधव यांची मुलगी रक्षा बंधाकरीता तीन चार दिवसांपूर्वी माहेरी आल्या होत्या. मात्र रक्षाबंधानापुर्वीच त्यांच्यावर आईवर काळाने झडप घातल्याने त्यांच्या मुलीला अश्रू अनावर झाले होते.
