
जळगाव मिरर | ३ एप्रिल २०२६
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव वेगाने धावणाऱ्या वाळूने भरलेल्या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने डी फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवार दि. २ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास दसेगाव फाट्याजवळ घडली. या अपघातात चंचल नामदेव लांडगे (वय १९) हिचा मृत्यू झाला असून तिच्यासोबत असलेली मैत्रीण वैष्णवी वैभव चौधरी (वय १९) ही गंभीर जखमी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंचल लांडगे ही चाळीसगाव येथील रहिवासी असून ती डी फार्मसीचे शिक्षण घेत होती. गुरुवारी दुपारी ती मैत्रीण वैष्णवी चौधरी हिच्यासह दुचाकीवरून दसेगाव फाट्याजवळून जात असताना भरधाव वेगाने वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत चंचल हिचा जागीच मृत्यू झाला, तर वैष्णवी गंभीर जखमी झाली. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत जखमींना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. वैष्णवी हिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच मेहुणबारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.
या अपघातामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. भरधाव वेगाने होणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीविरोधात संतप्त नागरिकांनी काही काळ रस्ता रोको आंदोलन करत निषेध व्यक्त केला. तालुक्यात वाढत चाललेल्या अवैध वाळू वाहतुकीवर तातडीने लगाम घालावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात अवैध वाळू वाहतुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.





















